…म्हणून देशातील रामभक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी – जयंत पाटील

वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

“राम मंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही? हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी.”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

राम मंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार आणि शिवसेना आणि भाजपा यांच्यात बुधवारी झालेल्या हाणामारीच्या मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी वरील आवाहन केले.

दरम्यान “या समितीने कायम राममंदिर उभारणीतील खर्च, जमाखर्च आणि त्याचा हिशोब हा त्रयस्थ समितीच्या निरीक्षणाखाली ठेवावा. कारण रामभक्तांची अपेक्षा आहे की, प्रामाणिकपणे मंदिराचं पावित्र्य राखून राम मंदिर उभं राहावं.” असेही जयंत पाटील म्हणाले.

तसेच, “अतिशय भक्तिभावाने राम मंदिर उभे व्हावे अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे म्हणून रामभक्त मोठ्याप्रमाणावर निधी देत आहेत. मात्र राममंदिर उभारणीत गोळा होणार्‍या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे.” अशी तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

याचबरोबर, “राम मंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे.”, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: So ram devotees in the country should form a non political committee jayant patil msr