गरोरदर पत्नीला भेटण्यासाठी शहरात येऊन गेलेला जावई लातूरमध्ये करोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतीने शहरातील प्रभाग क्रमांक १६ सील केला असून रूग्णाच्या संपर्कात आलेल्या गरोदर पत्नीसह पाच जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, या परिसरातील नागरिकांनी किमान चार दिवस घराबाहेर पडू नये, अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी दवंडी नगरपंचायतीकडून देण्यात आली.

लातूरहून एक तरूण बुधवारी (ता.२४) दुपारी बाराच्या सुमारास प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी शहरात आला होता. परजिल्ह्यातून एकजण आल्याचे कळाल्याने काही सजग नागरिकांनी याबाबत गुरूवारी (ता. २५) नगरपंचायत प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने तत्काळ संबंधित तरूणाशी संपर्क करुन त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. त्यावेळी ताप असल्याने तरूणाला क्वारंटाइन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतू त्यांने नकार देत तो लातूरला निघून गेला. लातूरला गेल्यानंतर त्याला अस्थव्यस्थ वाटू लागल्याने गुरूवारी रुग्णालयात दाखल करुन घेऊन स्वॅब घेण्यात आला. शुक्रवारी (ता.२७) सकाळी तो करोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला.

त्यानंतर लातूर महानगरपालिकेने खबरदारी घेत ते कोणाकोणाच्या संपर्कात आला होता. याची विचारपूस केली असता लोहाऱ्याला गेल्याचे तरूणाने सांगितले. त्यानंतर लगेच महानगरपालिकेने लोहारा नगरपंचायतचे कर्मचारी बाळू सातपुते यांच्याशी संपर्क करुन लोहाऱ्यात आलेली व्यक्ती लातूरमध्ये करोना पॉझिटिव्ह निघाल्याचे सांगितले. त्यानंतर नगरपंचायतचे मुख्यधिकारी गजानन शिंदे यांनी खबरदारी बाळगत शुक्रवारी शहरातील ईदगा मशीद परिसर सील करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या घरातील तीन जणांना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर गरोदर पत्नी व अन्य एका महिलेला होम क्वारंटान करण्यात आले आहे. गरोदर पत्नीचा स्वॅब घेण्यात आला असून उर्वरित चौघांचे स्वॅब सोमवारी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.