अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर दोन गटांमधील वादाने हिंसक वळण घेतले. आमदार विजय औटी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली.

नगरमधील पारनेर येथे शिवसेनेची सभा होती. या सभेत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. दोन गटांमध्ये आधी वाद झाला आणि त्यानंतर झालेल्या गोंधळात शिवसेना आमदार विजय औटी यांच्या कारचा धक्का लागल्याने शिवसेनेचे दोन स्थानिक नेते किरकोळ जखमी झाले आणि वाद चिघळला. संतप्त शिवसैनिकांनी तेथील कारवर दगडफेक केली. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर हा राडा झाल्याने पक्षाची नाचक्की झाली.

आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावर निलेश लंके गटाने बहिष्कार टाकला. मात्र, कार्यक्रम सुरु होताच लंके गटाने सभास्थळी गर्दी करुन शक्तीप्रदर्शन केले. लंके समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी केली. सभा संपल्यावर उद्धव ठाकरेंपाठोपाठ औटी देखील निघाले. औटी यांच्या कारचा धक्का लागल्याने लंके गटातील दोन जण किरकोळ जखमी झाले.