अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडली आहे. अजित पवारांनी पक्षातील बहुसंख्य आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत भाजपाशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांचा गट राज्याच्या सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले आहेत. या दोन गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच पक्षातील वादाचा शरद पवारांच्या (राष्ट्रवादीचे अध्यक्ष) कुटुंबावरही परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुनेत्रा पवार या बारामतीतून त्यांची नणंद आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनेत्रा पवार यांचा बुधवारी (१८ ऑक्टोबर) ६० वा वाढदिवस होता. यानिमित्त अजित पवारांच्या समर्थकांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स बारामतीत लावले आहेत. या होर्डिंग्सवर नव्या संसदेचा फोटो आहे. या फोटोमुळे सुनेत्रा पवार निवडणूक लढणाऱ असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.

शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्याविरोधात कोणीतरी निवडणूक लढलंच पाहिजे हा माझा अर्थातच आग्रह राहील. लोकशाहीत भारतीय जनता पक्ष माझ्याविरोधात एक नाही तर तीन वेळा निवडणूक लढला आहे. त्याच्या गैर काय आहे? कोणीतरी लढलंच पाहिजे. जो कोणी लढेल त्याचं मी स्वागत करेन. कारण माझं संविधानावर प्रेम आहे. माझं राजकारण आणि समाजकारण हे संविधानाच्या चौकटीतलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचं पोस्टर लावण्यात काहीच गैर नाही. एखाद्या कार्यकर्त्याची तशी इच्छा असेल, म्हणून त्याने ते पोस्टर लावलं असेल. आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे.

हे ही वाचा >> जरांगे-पाटलांकडे हिशेब मागणाऱ्या छगन भुजबळांना प्रकाश आंबेडकरांचा टोला; म्हणाले, “भायखळ्याच्या दुकानात बसणारा…”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा वहिणी विरुद्ध मी असा विषय नाही. ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई आहे. माझी कोणाशीच वैयक्तिक लढाई नाही. निवडणुकीला माझ्याविरोधात उभे राहतात ते माझे विरोधक नाहीत. दिल्लीत इतके खासदार आहेत, मंत्री आहेत त्या प्रत्येकाबरोबर माझे फोटो आहेत. प्रत्येकाबरोबर माझे चांगले संबंध आहेत. माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही. ही लढाई नैतिकतेची आणि वैचारिक आहे.