भाजपला रोखण्यासाठी आघाडीशी हातमिळवणीची तयारी?

भाजपपासून काडीमोड घेऊन ‘रालोआ’मधून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत काही काळापासून सरकारविरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व युवा नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर दौरे करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा मुद्दा उचलून भाजपविरोधात रान उठवले. शेतकऱ्यांची मतपेढी सांभाळण्याचे ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाचे अतोनात प्रयत्न आहे. त्यांनी बुलढाण्यासह राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचा चौफेर उधळणारा वारू रोखण्यासाठी स्वाभिमानीची आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची तयारी असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. आघाडी व स्वाभिमानी अशा दोन्ही बाजूंची गरज लक्षात घेऊन राज्यात हे नवीन समीकरण जुळून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

संघटनेत फूट पडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी आता स्वाभिमानीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यभर दौरे करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विविध आंदोलने करून सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

स्वाभिमानीने हातकणंगले, माढा, बुलढाणा, सांगली आणि कोल्हापूर या पाच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. आघाडीसोबत जाण्याच्या दृष्टीने स्वाभिमानीचे नेतृत्व सकारात्मक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व खासदार राजू शेट्टी यांच्यात भेटीगाठीचे सत्रही पार पडले असून यामध्ये आघाडी करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.   महायुतीत असताना स्वाभिमानीने हातकणंगले व माढा असे दोन मतदारसंघातून निवडणूक लढली होती. स्वाभिमानी आघाडीत सहभागी झाल्यास त्यांचा किमान तीन मतदारसंघांवर दावा राहणार असल्याची माहिती आहे. यामध्ये हातकणंगले, माढा व विदर्भातील बुलढाणा मतदारसंघाचा समावेश आहे. हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी दोन वेळा निवडून आले आहेत.   माढा मतदारसंघ न जिंकल्याची सल स्वाभिमानीच्या नेतृत्वाच्या मनात कायम आहे.  स्वाभिमानीने विदर्भातही पाय रोवण्यात सुरुवात केली असून, बुलढाणा मतदारसंघावर त्यांचे लक्ष आहे. गत काही वर्षांमध्ये बुलढाण्याचे रविकांत तुपकर स्वाभिमानी संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून समोर आले आहेत.माढा किंवा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तुपकरांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची स्वाभिमानीची तयारी आहे.

शिवसेनेशी युतीचा पर्याय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवसेनेसोबत जाण्याचाही पर्याय खुला आहे. महायुतीमध्ये शिवसेना व स्वाभिमानी संघटनासोबत होती. मात्र, स्वभिमानीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपची साथ सोडली. पदोपदी भाजपला विरोध करून सत्तेत कायम असलेल्या शिवसेनेने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. स्वाभिमानीच्या नेत्यांनी राज्यभर दौरे करून भाजपवर टीकेची झोड उठवली. मात्र, शिवसेनेवर टीका करण्याचे प्रकर्षांने टाळले. त्यामुळे भाजपपासून दुखावलेले शिवसेना व स्वाभिमानी संघटना आगामी काळात एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बुलढाणा जिल्ह्य़ात मोर्चेबांधणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत काही वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्य़ात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने खा. राजू शेट्टी यांचे बुलढाणा जिल्ह्य़ात दौरे झाले आहेत. रविकांत तुपकर यांनी जिल्ह्य़ात तळागाळात दौरे करून स्वाभिमानीच्या शाखा स्थापन करण्याचा झपाटा लावला. या माध्यमातून स्वाभिमानीचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीने बुलढाण्यात जोरदार तयारी सुरू केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या सर्व पक्षांपासून समान अंतरावर आहे. आघाडीसोबत किंवा अन्य कोणत्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करून पक्ष नेतृत्व घेईल. अद्याप चर्चा झाली नाही. पक्ष नेतृत्वाने व शेतकऱ्यांनी आदेश दिला तर, मी कुठूनही निवडणूक लढण्यासाठी तयार आहे.   – रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.