देशभरात स्वाइन फ्लूचा फैलाव वाढत असून महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्रात जानेवारी ते २ सप्टेंबर या कालावधीत ४,४५६ जणांचा स्वाइन फ्लूची बाधा झाली असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये स्वाइन फ्लू बाधितांची संख्या ४,४३१ व मृतांचा आकडा ३४२ पर्यंत पोहोचला आहे. शनिवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीतून देशभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

लहान मुले, वयोवृद्ध व गर्भवती महिलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने अशा रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा होते, असे स्वाइन फ्लूच्या तपासणी अहवालावरून दिसून आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

आकडेवारीनुसार महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षांत देशभरात २५,८६४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून मृतांची संख्या १,२६० पर्यंत पोहोचली आहे. या वर्षांत आढळून येणाऱ्या स्वाइन फ्लूच्या लक्षणांमध्ये बदल दिसून येत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्णांचे निदान लवकर होत नाही.

राज्यातील स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी संशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या आढळणाऱ्या स्वाइन फ्लूच्या अधिकतर रुग्णांमध्ये पूर्वआजार असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांची वेगळी मोजणी केल्यानंतर स्वाइन फ्लूची नेमकी आकडेवारी पुढे येईल.   -डॉ. सतीश पवार, संचालक, राज्य आरोग्य संचालनालय 

स्वाइन फ्लूची लक्षणे

  • ताप येणे
  • अतिसार
  • अंग व डोकेदुखी
  • सर्दी, खसा खवखवणे
  • श्वसनास त्रास होणे