नगर : करोनाच्या टाळेबंदीच्या काळात सर्व उद्योग बंद असताना कृषी क्षेत्रामुळेच देशाचे अर्थकारण जिवंत राहिले. त्यामुळेच शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या  विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून  देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ पदवीदान समारंभ आज, गुरुवारी आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी राज्यपाल कोश्यारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार, कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती दादा भुसे, उदयपूर (राजस्थान) येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौड, राहुरीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ आदी उपस्थित होते.

म. फुले कृषी विद्यापीठ संशोधन कार्याचा गौरव करून राज्यपाल म्हणाले की, विद्यार्थ्यांंनी संशोधनात्मक वृत्ती ठेवत काम केल्यास देशाची वाटचाल विकासाकडे होईल. कृषी विद्यापीठांनी आपल्या मराठी मातृभाषेचा सन्मान करत कृषी व तंत्रज्ञानाचे शिक्षण व कामकाज मराठी भाषेतून करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक पेटंट प्राप्त करावेत. सेंद्रिय व जीआय तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळतील.

कृषी मंत्री भुसे म्हणाले, कृषी विद्यापीठातील बहुतेक विद्यार्थी प्रशासनात मोठय़ा पदापर्यंत जातात. अशा उच्च पदावरील विद्यार्थ्यांंनी कृषी क्षेत्रातील प्रश्न, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तळमळ ठेवावी. विद्यापीठात ३० टक्के महिलांना प्रवेश असला, तरी येथे ५० टक्के महिलांना प्रवेश दिला गेला.

पदवीदानात ७० टक्के महिलांनी बाजी मारली आहे. सेंद्रिय शेती, प्रक्रिया उद्योग व विपणन यासाठी विद्यापीठात स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आले आहेत. राठौड यांचेही भाषण झाले. कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाचा कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला.

राज्यपालांची शरद पवारांवर स्तुतिसुमने

दीक्षान्त समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार शरद पवार या दोघांना कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राज्यपालांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. दोघांनी भाषणे केली नाहीत. मात्र राज्यपालांनी शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले गडकरी, पवार हे दोघे देशाचे चमकणारे तारे आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन करणारे, पीएचडी मिळवणारे आणि विद्यापीठानेही त्यांचा सल्ला वेळोवेळी घ्यावा. ते नेहमीच नवनवीन विचार मांडतात.

‘या’ जोखडातून मुक्त करा!

कृषिमंत्री भुसे यांनी राज्यपाल व शरद पवार यांच्याकडे विविध मागण्या केल्या. पीकविमा योजनेचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, त्यासाठी वेळ द्यावा. विद्यापीठाला कर्मचारी संख्याबळाचा व संशोधनासाठी निधीचा तुटवडा जाणवत आहे. राज्यपालांनी मराठी भाषेची सूचना केली, आता त्यांनी सर्व विद्यापीठातून कामकाज मराठीत व्हावे यासाठी आदेश द्यावेत. दीक्षान्त समारंभाचा गणवेश आता बदलायला हवा, या जोखडातून आम्हाला मुक्त करा, आपल्या राज्याची संस्कृती दिसेल असा गणवेश असावा.

राज्यपालांकडून मराठीचा आग्रह

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आजच्या दीक्षान्त समारंभात कुलगुरू डॉ. पाटील यांनी इंग्रजीतून प्रास्ताविक सुरू केले. काही वेळानंतर  राज्यपालांनी त्यांना मराठीतून बोला अशी सूचना केली. त्यानंतर पाटील यांनी पुढील मनोगत मराठीतून व्यक्त केले.