दृष्टिहिनतेवर मात करत चक्क एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करण्याची किमया पुण्यातील तरुणांनी साधली आहे. ‘टेकव्हिजन’ असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीचे शिलेदार आहेत सिद्धांत चोथे, नितीन बवारे, विशाल पवळे, राधिका येवले, ज्ञानेश्वर नेरकर, रुपाली कदम, संघपाल भोवटे आणि राहुल नलगे. दृष्टिहिनांसाठी काम करणाऱ्या ‘निवांत अंध मुक्त विकासालय’ या संस्थेतील हे सर्व तरुण आहेत.
एमसीएम, एमसीएस, बीए आणि माहिती तंत्रज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ‘निवांत’च्या दृष्टिहीन मुलांनी टेकव्हिजन कंपनीचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू केले. अमेरिकेतील एका कंपनीचे उपाध्यक्ष संस्थेच्या भेटीला आले होते. त्यांनी या मुलांना संगणकावर सराईतासारखे काम करताना पाहिले. उत्सुकता वाटून त्यांनी अधिक चौकशी केली व त्यांनीच दिलेल्या पहिल्या कामातून टेकव्हिजन कंपनी जन्माला आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका मीरा बडवे यांनी दिली. ही तर सुरुवात असूून आम्हाला खूप पुढे जायचे आहे. सध्या जास्त कामे मिळविण्याच्या मागे लागण्यापेक्षा आमचे आमच्या कामाच्या दर्जाकडे लक्ष आहे. तो टिकवणे महत्त्वाचे आहे, तो टिकला तरच कामे मिळतील, अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धान्त चोथे यांनी दिली.

संकेतस्थळाचेही काम सुरू : बोश सॉफ्टवेअर, बोर्डवॉकटेक तसेच ‘निवांत’चे संकेतस्थळ आणि नेटविश्वाशी संबंधित संस्थेची इतर कामेही टेकव्हिजनतर्फेच केली जातात. या व्यतिरिक्त ‘वेब अ‍ॅक्सेसिबिलिटी टेस्टिंग’चे कामही या ठिकाणी करण्यात येते. एखादे संकेतस्थळ दृष्टिहिनांना वापरण्याजोगे आहे अथवा नाही हे अ‍ॅक्सेसिबिलिटी टेस्टिंगद्वारे ठरविले जाते.

नफ्यातील कंपनी : सध्या टेकव्हिजनला ४० टक्के नफा मिळतो. वेब डिझाइन आणि अ‍ॅक्सेसिबिलिटी टेस्टिंगबरोबरच व्हिज्युअल बेसिक, जावा, ओरॅकल, सी प्लस प्लस, पीएचपी, मायएसक्यूएल यामध्येही ‘टेकव्हिजन’ कार्यक्षम आहे.

भ्रष्टाचार, घोटाळे, खून, बलात्कार, चोऱ्या, हाणामाऱ्या अशा नकारात्मक बातम्यांनी कायमच वृत्तपत्रांचे रकाने व्यापलेले असतात. या धबडग्यात काहीतरी चांगलं, विधायक, सकारात्मक असंही घडत असतं. त्यातील वेचक अशा सकारात्मक बातम्यांसाठी वाचा ‘लोकसत्ता-चांगभलं’!