सोलापुरात गुरुवारी एकाच दिवशी दहा करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यातील नऊ  रुग्ण हे एका खासगी रुग्णालयातील करोनाबाधित महिला कर्मचाऱ्याशी संबंधित आहेत. हे सर्व रुग्ण ज्या भागात राहतात, तो जोड बसवण्णा चौक-तेलंगी पाच्छा पेठेचा परिसर दाट लोकवस्तीचा व श्रमिकांचा असून तेथे झोपडपट्टय़ाही आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात संशयित व्यक्तींपैकी ४५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल येणे अपेक्षित होते. त्यापैकी ४२ चाचणी अहवाल गुरुवारी हाती आले असता त्यात दहा जणांना करोना विषाणूंची बाधा झाल्याचे दिसून आले. तर उर्वरित ३२ जणांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले. आणखी तीन चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. आज एकाच दिवशी आढळून आलेल्या दहा करोनाबाधित व्यक्तींपैकी एक जण यापूर्वी करोनाबाधित मृत व्यापाऱ्याशी संबंधित आहे. तर अन्य नऊ  व्यक्ती खासगी रुग्णालयातील करोनाबाधित महिला कर्मचाऱ्याच्या संबंधातील आहेत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

गेल्या रविवारी जोड बसवण्णा चौक—तेलंगी पाच्छा पेठ भागात राहणाऱ्या एका मृत व्यापाऱ्याला (वय ५६) करोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. तत्पूर्वी, या व्यापाऱ्याला आजारपण वाढल्यामुळे त्याच्या घराजवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास १४८ जणांची वैद्यकीय चाचणी घेतली असता त्यात मृत व्यापाऱ्याशी संपर्कात आलेल्या संबंधित खासगी रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यालाही करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. तिच्या संबंधातील २२ जणांसह सर्वांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. यापैकी १२४ अहवाल काल गुरूवारी प्राप्त झाले असता त्यात एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. उर्वरीत ४५ चाचणी अहवाल प्रतीक्षेत असताना त्यापैकी ४२ अहवाल हाती आली आणि त्यात दहा करोनाबाधित रुग्णांचा शोध लागला. आणखी तीन चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे असतानाच आज नव्याने आढळून आलेल्या दहा रुग्णांचा संपर्क कितीजणांशी आला होता, याचा शोध घेऊ न संबंधित व्यक्तींना वैद्यकीय चाचणीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे.

साधनसामग्रीचा अभाव

सोलापुरात गेल्या रविवारपर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु आता हे रुग्ण समोर येत आहेत. यातील बहुतांश लोकांना शहरातील खासगी रुग्णालयातून संसर्ग झाला आहे. या संबंधित रुग्णालयापासून ते शहरातील सर्वच रुग्णालयात सध्या तेथील कर्मचारी, परिचारिकांपासून ते थेट डॉक्टरांपर्यंत कुणाकडेच या साथीला अटकाव करणारी साधने नसल्याचे पुढे आले आहे. अशी काळजी घेतली जात नसल्याने सोलापुरातील हा आकडा अजून वाढण्याचा धोका आहे.