मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घोषणेने कर्जतकरांच्या आनंदाला उधाण आले असले तरी संदिग्ध घोषणेमुळे शहरात नगरपंचायत की नगरपरिषद हा संभ्रम कायम आहे. जल्लोषाचा उत्साह संपल्यानंतर आता हाच काथ्याकूट सुरू आहे.  
कर्जत पंचायत समितीचे उपसभापती किरण पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा परिषद सदस्य परमवीर पाडुंळे, बापूसाहेब नेटके व धनराज कोपनर आदींनी या निर्णयाचे स्वागत केले. शहरात नगरपंचायत किंवा नगरपरिषद जे काही होईल त्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मोठा सहयोग असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
आमदार राम शिंदे म्हणाले, कर्जत येथे नगरपरिषद व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले. जामखेड नगरपरिषदेच्या वेळीच नगरपंचायत होणार असल्याने आपण नकार दिला होता. मात्र आता नगरपरिषदेचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये आज दिवसभर नगरपरिषद की नगरपंचायत याबाबतच उलटसुलट चर्चा सुरू होती. दोन्हीतील फरक व फायदे-तोटेही नागरिक समजून घेण्याचा नागरिक प्रयत्न करीत आहेत.