पनवेल महापालिकाक्षेत्रातील वसाहतनिहाय करोनाच्या रुग्णांची स्थिती प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार, कामोठे भागात आजपर्यंत सर्वाधिक १५७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक ८ रुग्णांचा इथे मृत्यू झाला आहे. दरम्यान, बुधवारी कामोठे वसाहतीमधील प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी संपत असल्याने इथे लॉकडाउनमध्ये काहीशी शिथिलता आणण्यात येत आहे, त्यामुळे येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

रायगड जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णाच्या ८९ टक्के रुग्ण हे पनवेल आणि उरण या दोन तालुक्यांतील आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पनवेल पालिका क्षेत्रात आणि त्यात कामोठे वसाहतीमध्ये आढळले आहेत. कामोठेमध्ये आजवर सर्वाधित १५७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी ९४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या ठिकाणची रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ५९.८७ इतकी आहे.

पनवेल तालुक्यातील सहा विभागांमधील करोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार, तालुक्यात आजवर ४०१ रुग्ण आढळून आले असून त्यांपैकी २३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी १४९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. संपूर्ण तालुक्यातील रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ५८.३५ टक्के इतकी आहे.