सोलापूर : सोलापूर राखीव आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या शक्तिप्रदर्शनाच्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन ‘हाथ की सफाई ‘ केली. एका भाजप कार्यकर्त्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी अलगदपणे लंपास केली.

गेल्या १६ एप्रिल रोजी झालेल्या चोरीची नोंद चार दिवसांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे. सोलापूर लोकसभेचे राम सातपुते आणि माढा लोकसभेचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोन्ही भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन झाले होते.

हेही वाचा…सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी

त्यावेळी निघालेल्या मिरवणुकीत देवीदास रेऊ राठोड (वय ५८, रा. वडजी, ता. दक्षिण सोलापूर) हे सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराज चौकातून ही मिरवणूक निघाली असता तेथेच राठोड यांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.