इगतपुरी तालुक्यातील पाझर तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. मृतांमधील दोन मुले सिन्नर तालुक्यातील तर एक जण इगतपुरीच्या साकुर गावातील आहे.
अजय तुपे (१२), संकेत तुपे (१०) व संतोष सहाणे (१२) अशी त्यांची नांवे आहेत. सिन्नर तालुक्यातील बेलू येथील वाळू तुपे यांची अजय व संकेत ही मुले सुट्टीच्या काळात ईगतपुरी तालुक्यातील आपल्या आत्याच्या घरी आले होते. आत्याचा मुलगा संतोष सहाणे याच्यासोबत ते गावालगतच्या पाझर तलावावर अंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही बाब जवळच असणाऱ्या गुराख्याच्या लक्षात आली. त्याने पाझर तलावाकडे धाव घेतली. दरम्यानच्या काळात ग्रामस्थही धावून आले. परंतु, पाण्याबाहेर काढेपर्यंत ती मृत झाली होती. तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. इयत्ता पाचवी व सहावीमध्ये ते शिक्षण घेत होते.