हजारोने जमलेली गर्दी नियंत्रणात आणण्यात प्रशासनाची दमछाक

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर येथून बुधवारी उत्तरप्रदेशला जोनपूर, वाराणसी, सुल्तानपूर येथे जाणाऱ्या तीन श्रमिक रेल्वेगाडय़ा प्रशासनामार्फत सोडण्यात आल्या. या गाडय़ांतून जाण्यासाठी हजारो नागरिकांची आर्यन मैदानावर गर्दी केली होती. ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाची दमछाक झाली.

पालघरहून रेल्वेगाडी सोडण्यात येणार असल्याने  पालघर शहरातील आर्यन मैदानावर हजारो जण मध्यरात्रीपासून दाखल झाले होते.   नागरिकांना टोकन देण्यापासून आरोग्य तपासणी व रेल्वेगाडीत बसेपर्यंतचे नियोजन प्रशासनामार्फत चोख करण्यात आले होते. तरी अचानक झालेली हजारोंची ही गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जाताना पहावयास मिळाली.

नियोजनाप्रमाणे वाराणसीला जाणारी गाडी १२ वाजता,जोनपूरला जाणारी गाडी ३ वाजता व सुल्तानपूरला जाणारी गाडी संध्याकाळी ६ वाजता सुटणार होती. मात्र, त्याचे  नियोजन करता करता वेळ गेल्याने त्या काही काळ उशिराने सोडल्या गेल्या.  प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर व तहसीलदार सुनील शिंदे  मैदानावर नियोजन करताना पहावयास दिसले.  गर्दी हाताळताना महसूल प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली. त्यामुळे काही काळ मैदानावर सामाजिक अंतराचा फज्जा उडाला होतो.

सुविधांचा अभाव

खुल्या मैदानावर अनेक सुविधांचा अभाव दिसून येत होता. नागरिकांना माहिती देण्यासाठी ध्वनिक्षेपक, गर्दी रोखण्यासाठी अडथळे आदी आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने  आवाक्याबाहेर गेलेल्या गर्दीवर नियंत्रण राहिले नाही.

आजही तीन रेल्वेगाडय़ा

अजूनही हजारो नागरिक मूळ गावी जाण्याच्या प्रतीक्षेत असून नोंदणी झालेल्या नागरिकांसाठी गुरुवारीही  उत्तरप्रदेशातील प्रतापगड, जोनपूर, वदोही इथे जाण्यासाठी रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

नोंदणी न झालेल्यांनाही टोकन

प्रशासकीय नियोजन  समाजमाध्यमांवर पसरवले गेल्याने  गर्दी झाली. ती नियंत्रणात आणण्यासाठी नोंदणी न झालेल्या नागरिकांनाही टोकन द्यावे लागले. यामुळे रेल्वे गाडीतून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली.