चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला. हे दोन्ही बछडे अंदाजे सहा ते आठ महिन्यांचे असून दोन्ही मादी बछडे आहेत. गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे.

वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र ४१० आणि कक्ष क्र ४७७ मधून रेल्वे मार्ग जातो. या मार्गावरून चंद्रपूर-गोंदिया ही रेल्वे जाते. सकाळी वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीची वेळ असते. हे दोन्ही बछडे आईसोबत मार्ग ओलांडत असावेत आणि आई समोर निघाल्यानंतर रेल्वेच्या धडकेत दोन्ही बछडे मृत पावले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी ७ वाजता घटनेची माहिती कळताच वनविकास महामंडळाचे अधिकारी ऋषिकेश रंजन, विभागीय वनाधिकारी दावडा, सोनकुसरे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेचे मुकेश भांडारकर घटनास्थळी पोहचले. या घटनेने पुन्हा एकदा जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.