कोल्हापुरातील टोलविरोधात टोलविरोधी कृती समितीतर्फे बुधवारी सकाळपासून ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरातील प्रत्येक टोलनाक्यापासून १०० मीटर अंतरावर आंदोलकांनी स्वतःच्या गाड्या रस्त्यावर लावून ठिय्या आंदोलन सुरू केले.
मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकडून शहराकडे येताना लागणाऱया शिरोली टोलनाक्यावर एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, महापौर सुनीता राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली शांततेत आंदोलन सुरू आहे. टोल देणार नाही, अशा पद्धतीचे स्टिकर्स आंदोलकांनी आपल्या शर्टवर लावले आहेत. आंदोलनामुळे शिरोली टोलनाक्यापलीकडे वाहनांची मोठी रांग लागली आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मनसेचेही रास्ता रोको
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी आंदोलन केले. सुमारे १०० कार्यकर्ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनात सहभागी झाले होते. अर्धातास महामार्गाच्या बाजूला आंदोलकांनी टोलविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेतले.
मनसे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्यामुळे पहाटेपासूनच महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतरही काही आंदोलकांनी सुमारे सात ते आठ ट्रकची हवा सोडली. यामुळे अर्धातास राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलीसांनी क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला केल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.
पक्षाचे शहराध्यक्ष राजीव बिंडुर्ले, प्रसाद पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगल शेटे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. पोलीसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले असून, त्यांना जिल्हा मुख्यालयात हलविण्यात आले आहे.