जागतिक आदिवासी दिना निमीत्त आदिवासी खाद्य संस्कृती जोपासण्याच्या हेतूने लोकबिरदारी प्रकल्पाने पारंपारिक धान्य संवर्धन व लागवड या नवीन प्रयोगाचा शुभारंभ केला आहे. या प्रयोगातून पारंपारिक धान्याच्या बिजाईची बँक तयार केली जात असून श्रमदानातून सामुहिक शेतीचा प्रयोग केला जात आहे. या माध्यमातून कुपोषणाविरूध्द एल्गार पुकारण्यात येणार आहे.

भामरागड येथे लोकबिरादरी प्रकल्पात जागतिक आदिवासी दिवस अनिकेत आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यातच या कुपोषण विरूध्द लढ्याचा एल्गार पुकारण्यात आला आहे. अमाप कष्ट आणि पैसा ओतून भामरागडचे शेतकरी धान्य पिकवत आहेत, पण अनेक अडचणी आणि बाजार भाव फार नसल्याने हवा तसा नफा मिळत नाही, परिणामी दारिद्र आणि कुपोषण आहे. पारंपरिक धान्य संवर्धन व लागवड या उपक्रमाअंतर्गत या दोन्ही संकटांवर मात करता येईल. रोजच्या जेवणातील वैविध्य वाढल्याने कुपोषणवर मात करता येईल व पारंपरिक धान्यांच्या विक्रीला बाजार भावही चांगला मिळतो.

या उपक्रमा अंतर्गत १८ ते ३० या वयोगटातील तरुणाना स्वयंरोजगारची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्या तरुण शेतकऱ्यांना सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी प्रकल्पाशी संपर्क साधावा. जिंजगाव येथील गावकऱ्यांच्या पुढाकारने २०१९ मध्ये साधना विद्यालय या शाळेची स्थापना झाली. त्याच अंतर्गत तरुण मुलांना स्वयंपूर्ण व सक्षम बनवण्यासाठी अनेक उपक्रम नियोजनात आहे. त्यातील पहिला टप्पा हा पारंपारिक धान्य संवर्धन व लागवड हा उपक्रम आहे. या प्रकल्पाची जबाबदारी अमित कोहली व शांती गायकवाड यांची असून पहिला कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडला आहे.

लोकबिरदारी प्रकल्पाच्या समीक्षा आमटे यांनी अनेक दुर्गम गावांमध्ये जाऊन ५ पारंपरिक धान्याचे (धान/तांदूळ सोडून) बिजाई गोळा केली आहे. तसेच विविध ७ डाळींची बिजाई देखील आहे. डाळींची पेरणी दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. हे वर्ष धान्य बिजाई बँक निर्मिती व डेमो प्लॉटच्या मार्फत शिक्षण-प्रशिक्षण करुन, उत्पादन व विक्री पुढील वर्षात करायचा मानस आहे. पहिल्या प्लॉटची लागवड सामुहिक श्रमदानातून मौजा जिंजगाव येथे करण्यात आली. येत्या काही दिवसांत मौजा हेमलकसा, रानिपोडूर व नेलगुंडा या गावांमध्ये करण्यात येणार आहेत. गोटुल मध्ये आल्यावर काही शैक्षणिक खेळ खेळण्यात आले. भामरागडचे प्रकल्प अधिकारी मनुज जिंदल यांनी सदिछा भेट देऊन दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. बांदीयानगर येथील तरुणांनी पारंपारिक पोषाख व नृत्य सादर करुन उपस्थितांचे मन जिंकले. शामराव शेडमाके यांनी अतिशय ओघवते व आत्मविश्वाासाने उपस्थितांना उद्बोधन केले. विविध धान्य व डाळी अनेक वर्षांपासून आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य घटक होती. पण काळानुरुप धान (तांदूळ) आणि बरबटी हे दोघेच राहिले. आदिवासी दिनानिमीत्त आदिवासी खाद्य विविधता व संस्कृती जोपासण्याचा संकल्प करण्यात आला आहे.