सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करून उजनी धरणाचे पाणी थेट स्वतःच्या इंदापूर व बारामतीला नेण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क तृतीयपंथीय मंडळींनी एकत्र पालकमंत्री हाय हाय म्हणत, प्रतिकारात्मक दगडावर जलाभिषेक केला.
या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व तृतीयपंथीयांनी उजनी पाणी प्रश्नावर तीव्र भावना मांडत पालकमंत्री भरणे यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. जिल्ह्यात एखाद दुसरा अपवाद वगळता बहुसंख्य सिंचन योजना अर्धवट आहेत. या योजना पूर्ण झाल्यास जिल्ह्यात उजनी धरणाचे हक्काचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात येईल आणि शेतकऱ्यांच्या अंगणात ख-या अर्थाने नंदनवन फुलणार आहे. परंतु त्यासाठीची जबाबदारी टाळून, आपण सोलापूरचे पालकमंत्री आहोत, सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आपले कर्तव्य आहे, हेच भरणे विसरले आहेत. सोलापूरचे पालकमंत्री आणि विकास मात्र इंदापूर व बारामतीचा, हे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देताना या तृतीयपंथीयांनी भरणे यांची पालकमंत्री म्हणून काम करण्याची विश्वासार्हता गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सोलापुरात आठवड्यातून एकदाच पिण्याचे पाणी मिळते. शेतीलाही वर्षानुवर्षे उजनीच्या पाण्याची केवळ प्रतिक्षाच आहे. तुम्हाला कारभार जमत नसेल तर आम्हा तृतीयपंथीयांकडे कारभार द्या, असेही त्यांनी सुनावले.
याच आंदोलनात एका तरूण पोतराजाने सहभागी होताना पालकमंत्री भरणे यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ स्वतःवर आसूड मारून घेतले. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

राष्ट्रवादीचे मौन

दरम्यान, मागील आठवड्यापासून उजनीच्या पाणी प्रश्नावर पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात पेटलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मौन बाळगून आहेत. जिल्ह्यात माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू तथा करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे दोघेही पवार समर्थक आहेत. यापूर्वी या दोघांनी उजनीतून इंदापूर व बारामतीला पाणी नेण्यास विरोध केला होता. आता मात्र त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष भारत जाधव हेदेखील या प्रश्नावर बोलायचे टाळत आहेत.