रायगडमधील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. महाबळेश्वर परिसरात सुरु असेलेल्या संततधार पावसामुळे ही दरड कोसळली असून उद्या सकाळी दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरात आंबेनळी घाटात दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्रतापगडाच्या पायथ्याशी रस्त्यावर मातीचा मोठा ढिगारा कोसळला. या घटनेनंतर पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्रीच्या काळोखात घाटरस्त्यावर दरडी हटवण्याचे काम करणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून दरड हटवण्याचे काम सकाळी सुरु केले जाणार आहे. संततधार पावसामुळे पाण्यासोबत मातीचे ढिगारे खाली येत आहेत. जेसीबी मशीनच्या मदतीने हे ढिगारे हटवण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र पुन्हा मोठा मातीचा ढिगारा खाली आल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.