शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सर्वागीण विकासासाठी नगरपालिका प्रयत्नशील असल्याची ग्वाही नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी आज येथे दिली. नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या शताब्दी महोत्सवानिमित्ताने व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नगररचना कार्यालय आणि ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉ. बडगिरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. या वेळी सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शहरात डासांच्या उपद्रवाची समस्या फार मोठी असून डासांच्या निर्मूलनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे नाईक म्हणाल्या. गटारे, रस्ते, स्वच्छता आदी बाबींसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. रचनात्मक आणि सुंदर असे विकास आराखडे नगररचना कार्यालयाकडून तयार केले जात असल्याबद्दल नगराध्यक्षांनी नगररचना कार्यालयाचे कौतुक केले. नगररचना कार्यालयाचे साहाय्यक संचालक अभिराज गिरकर यांनी नगररचनेचा पूर्वेतिहास आणि कार्याची सविस्तर माहिती या वेळी विशद केली. ते म्हणाले, नगररचनेच्या कार्यात सर्वागीण विकास आराखडा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी जनतेचे जागृतपणे या काळात योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. शहर हे ग्रामीण भागाशी निगडित असल्याने नगररचना कार्यालयाकडून प्रादेशिक योजनाही तयार केल्या जातात आणि हे केले जाणारे काम म्हणजे अप्रत्यक्षपणे केले जाणारे सामाजिक कार्यच आहे, असे गिरकर म्हणाले. आरोग्य शिबिराच्या आयोजनाविषयी माहिती ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष ल. नी. नातू यांनी या वेळी दिली. ज्येष्ठांना किती व कसा लाभ घेता येईल याचा विचार करून अनेकविध कार्यालयांच्या आयोजनासाठी संस्था प्रयत्नशील असते, असे नातू यांनी या वेळी सांगितले. आरोग्य अधिकारी डॉ. बडगिरे यांनी आरोग्यविषयक माहिती देताना शहरातील डासांचा प्रादुर्भाव नष्ट करण्याच्या दृष्टीने कठोर कार्यवाही करण्याबाबत आपले मत व्यक्त केले.
शिबिरात व्याख्यान देणारे मनोविकारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे व डॉ. मेघा घाटे यांचा अभिराज गिरकर यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नगररचनाकार राजू पंडित यांनी प्रास्ताविक केले, तर साहाय्यक नगररचनाकार पुष्पराज मगर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि शेवटी आभार प्रदर्शन केले. कार्यालयाचे सूत्रसंचालन मगर यांनी केले. शिबिरात डॉ. डोंगरे, डॉ. वाजे, डॉ. मेघा घाटे यांची व्याख्याने आणि महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. द्वारकानाथ तथा बबन नाईक, नगररचना कार्यालयाचे प्रतिनिधी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी, सभासद तसेच महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.