नक्षलवादी असल्याचे सांगून नांदेडच्या दोन प्रसिद्ध डॉक्टरांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या संतोष अम्ले या तरुणास स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने सोमवारी सापळा रचून पकडले. हा कथित नक्षलवादी हिंगोली जिल्ह्य़ातील आखाडा बाळापूरचा रहिवासी आहे.
शहरातील डॉ. देवेंद्र पालिवाल व डॉ. मनीष कत्रुवार यांना गेल्या काही दिवसांपासून खंडणीसाठी फोनवरून धमक्या येत होत्या. आपण नक्षलवादी आहोत, ‘तुम्ही मला खंडणी द्या अन्यथा जिवे मारू,’ अशी धमकी दिली जात होती. सततच्या या प्रकाराला कंटाळून दोन्ही डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी शहरातील आनंदनगर परिसरात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस यंत्रणा पुढील चौकशी करत आहे.
आमचे हिंगोलीचे वार्ताहर तुकाराम झाडे कळवतात, की पकडण्यात आलेला संतोष अम्ले हा आरोपी मजुरीचे काम करतो. एका शेतकऱ्याकडे तो सालगडी म्हणून कामाला होता. गेल्या चारपाच महिन्यांपासून तो बाळापूर येथून बेपत्ता होता. या काळात त्याने गडचिरोली येथे जाऊन नक्षली प्रशिक्षण घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर हे वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव असून या गावांमधील हनुमाननगर हा भाग बोल्डा रोड भागाकडे असून या वस्तीत राहणारे बहुसंख्य मंडळी आदिवासी समाजातील आहेत. आरोपी अम्ले याने नांदेडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी २० लाख खंडणीसाठी धमकावले. संतोषचे वडीलही सालगडी आहे. संतोषकडे ७० हजार किमतीची दुचाकी आहे. ती मित्राकडून वापरण्यास घेतली असल्याचे तो सांगतो. तो २००८ मध्ये वनरक्षकाच्या भरतीसाठी गडचिरोली येथे गेला होता. तेथे अहिरी भागात त्याला चारपाच व्यक्ती भेटल्या. त्यांनी वनविभागात भरती होण्यासाठी पदवी लागत असल्याचे सांगत, त्याला नक्षलींसमवेत काम केल्यास अधिक रक्कम मिळू शकेल, असे सांगितले. मात्र तो आखाडा बाळापूरला परतला. त्यानंतर २०१२ मध्ये तो परत त्यांच्या संपर्कात आला व बाहेर राहून त्यांची कामे करू लागला, असे स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रहेमान यांनी सांगितले.