आज, रविवारी ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपणार आहे. उद्यापासून देशात पाचव्या लॉकडाउनची सुरूवात होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर नियम आणि अटी केंद्र सरकारने शनिवारी जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन कसा असावा याबाबत राज्याला अनेक आधिकार दिले आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन जारी केल्यानंतर काही वेळात लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत या बैठका होत्या की लॉकडाउनसंदर्भात यावरून आता राजकीय चर्चा रंगल्या आहेत. राज्यातील लॉकडाउनमध्ये टप्पाटप्प्याने सूट देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतं आहे.

राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध अधिक शिथिल करण्याबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीत मतभेद कायम असल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात जास्तीत जास्त सवलती देण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जात असली तरी मुख्यमंत्री मात्र कठोर निर्बंध कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे समजते.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी रात्री चर्चा झाली. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्यत्र दुकाने काही काळ उघडण्यास परवानगी द्यावी, तसेच उद्योगधंदे सुरू व्हावेत, अशी पवारांची भूमिका आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी पवारांची मागणी असल्याचे समजते.

राज्यात करोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउनमधून कोणत्या गोष्टींना सूट मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून रविवारी संध्याकाळपर्यंत नवे दिशानिर्देश जारी केले जातील, असं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे.