श्रीवर्धन तालुक्यातील सायगाव परिसरात अमोनियम नायट्रेटची तब्बल ३५ पोती रायगड पोलिसांनी जप्त केली आहे. बॉक्साइट खाणीतील उत्खननासाठी त्याचा बेकायदेशीर वापर केला जातो. याप्रकरणी अल्तगे स्टोन क्रशिंग कंपनीचे मालक चेतन नवनीतलाल शहा यांच्यावर श्रीवर्धन ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, बागमांडला, सायगाव परिसरात सध्या बॉक्साइटचे उत्खनन केले जाते आहे. यासाठी अल्तगे स्टोन क्रशिंग कंपनी काम करते आहे. बॉक्साइट उत्खननासाठी स्फोट करण्यासाठी कंपनीला केवळ नायट्रेट मिक्श्चर , इलेक्ट्रॉनिक, ऑर्डनरी डिटोनेटर्स वापरण्याचा परवाना आहे. मात्र कंपनीकडून स्फोट घडवून आणण्यासाठी चक्क अमोनियम नायट्रेटचा वापर केला जात असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब समोर आल्यावर श्रीवर्धन पोलिसांनी उपविभागीय अधिकारी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कंपनीवर छापा टाकला असता, उत्खननाच्या ठिकाणी प्रत्येकी पन्नास किलो वजनाच्या तब्बल ३५ गोणी आढळून आल्या. याप्रकरणी अल्तगे स्टोन क्रशिंग कंपनीचे मालक चेतन शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता हा अमोनियम नायट्रेटचा साठा आला कुठून, याचा तपास पोलीस करत आहे.