वेदप्रताप वैदिक आणि हाफिजचे संबंध कधीपासून आहे ते तपासण्याची गरज असून देशद्रोहीशी बोलणारा देशद्रोहीच असतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. येथे बुधवारी आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी वैदिक-हाफिज संबंधापासून तर राज्यातील राजकीय घडामोडींविषयी मत मांडले.
जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणात सुमारे अडीच वर्षांपासून तुरूंगात असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन  यांच्यावर अन्याय होत असल्याचेही उध्दव ठाकरे यांनी नमूद केले. सुरेश जैन आपलाच माणूस असल्याने मुद्दाम येथे आल्याबरोबर त्यांच्या घरी गेलो. त्यांनी असं काय केले की त्यांना अडीच वर्षांपासून जामीन मिळत नाही. राष्ट्रवादीला खूनाचा आरोप असलेला माणूस लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून चालतो. पण, सुरेश जैनसारखी व्यक्ती चालत नाही. सुरेश जैन यांचा गुन्हा न्यायालयात सिद्ध करण्याऐवजी पोलीस जैन यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधानसभा सभापतींची परवानगी मागत आहेत. उद्याचे सरकार आमचे आहे हे लक्षात ठेवा. तुम्हालाही आधी आत टाकू आणि नंतर गुन्हे सिद्ध करण्याचा विचार करू, असे ठाकरे यांनी सुनावले. घराघरात पोलीस नेमले तरी महिलांवरचे अत्याचार थांबणार नाहीत, या राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे यांनी पोलिसांपेक्षा घरोघरी शिवसैनिक उभे करतो. ते महिलांचे संरक्षण करतील असे सांगितले.

वैदिक संघाचेच; काँग्रेसचा पुनरुच्चार
नवी दिल्ली: प्वैदिक हे संघ स्वयंसेवकच आहेत यात शंका नाही, असे पक्ष प्रवक्त्या शोभा ओझा यांनी स्पष्ट केले. सईदला भेटण्यामागे वैदिक यांचा हेतू काय होता, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे.इंदूरमध्ये वैदिक यांचे कुटुंब संघाचे म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, असे ओझा यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानी पत्रकारही सईदला भेटू शकत नाहीत. मग ही भेट कुणी घडवून आणली, असा सवाल त्यांनी केला. वैदिक यांनी कुणाकुणाला दूरध्वनी केले याचा तपशील तपासावा, अशी मागणीही ओझा यांनी केली. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी आणि नंतर ते कुणाला भेटले याची चौकशी करा, अशी मागणीही ओझा यांनी केली.