विरारमधील एका आश्रमशाळेत झालेला ‘डायरो’ हा धार्मिक कार्यक्रम वादात सापडला आहे. या कार्यक्रमात पहाटेपर्यंत गायिकांवर लाखो रुपये उधळल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आयोजकांनी मात्र हा आरोप फेटाळताना डायरो हा पारंपरिक कार्यक्रम असून गोशाळेच्या निधीसंकलनासाठी पोलिसांच्या परवानगीनेच तो आयोजित केला होता,असे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले.
विरार पूर्वेकडील रायपाडा येथे आनंदधाम गोशाळा हा आश्रम आहे. सामाजिक कार्यासाठी आश्रमातर्फे दरवर्षी डायरो या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात गायकांवर पैसे उधळले जातात. हे पैसे नंतर सामाजिक कार्यासाठी वापरले जातात. शनिवारी रात्री आश्रमात डायरो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजस्थानमधील प्रसिध्द गायिका गीताबेन राबरी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात वसई विरारसह मुंबईतून हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी गायिकांवर पैसे उधळण्यात आले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावार आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी होती का? पहाटेपर्यंत असे पैसे उधळणे योग्य होते का असे सवाल उपस्थित झाले आहेत.




दरम्यान, आश्रम व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. डायरो हा गुजरात मधील पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सामाजिक कार्यासाठी निधी संकलन करण्यासाठी भजन आणि धार्मिक गाणी सादर केली जातात आणि त्यात गायकांवर पैसे उधळले जातात. हे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले जातात असे आश्रमच्या संचालिका माताजी वीणा चौहान यांनी सांगितले. ज्यांना हा प्रकार माहित नाही त्यांनाच तो चुकीचा वाटतो. आमचा हा सहावा डायरो कार्यक्रम होता. त्याला पोलिसांची परवानगी होती. कार्यक्रमात कुठल्याही करोना नियमांचे उल्लंघन झालेले नाही. कार्यक्रमासाठी चार हजारांहून अधिक जण उपस्थित होते. पण प्रत्येकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासून, निर्जंतुकीकरण करून प्रवेश देण्यात आला होता अशी माहिती माताजी वीणा यांनी दिली. कार्यक्रमात हिंदी सिनेमातील गाणी नव्हती तर सिनेमांच्या चालीवर भजने होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्याकडे कुठलाही तक्रार आलेली नाही. आम्ही परवानगी दिलेली नव्हती. मात्र या प्रकरणाची माहिती घेऊन जर कुठल्या नियमांचे उल्लंघन झाले असेल तर कारवाई केली जाईल, असे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.