अमरावतीत तणावपूर्ण शांतता, इंटरनेट व संचारबंदी कायम ; ९० जण अटकेत, भाजपसह अनेक नेते स्थानबद्ध

अफवा रोखण्यासाठी कालपासून शहरातील इंटरनेट, एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे.

अमरावती : शहरात सलग दोन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी कायम असून रविवारी तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून आतापर्यंत दोन्ही गटातील ९० जणांना अटक करण्यात आली आहे.

भाजपचे नेते व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. अफवा रोखण्यासाठी कालपासून शहरातील इंटरनेट, एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे सर्वसामान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले.

त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ येथील मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान दगडफेक, मारहाण करण्यात आली, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपने शनिवारी ‘अमरावती बंद‘ पुकारला. त्याला हिंसक वळण लागले. दोन्ही गट समोरा समोर आल्याने दंगल सदृश स्थिती निर्माण झाली होती.

शहरात शनिवारपासून पोलीस बंदोबस्त वाढवत राज्य राखीव पोलीस दलाच्या ८ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय जालना, नागपूर, वर्धा, बुलढाणा येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. शहरात संचारबंदी कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. इंटरनेट सेवा बंद असल्याने सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प पडले आहेत.

दरम्यान, आज पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत कायदा सुव्यवस्थेच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व समुदायातील लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे. पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात पथसंचलन केले. सकाळी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक नेते उपस्थित होते. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे, आवाहन यावेळी करण्यात आले.

१७ नोव्हेंबपर्यंत अकोटमध्ये जमावबंदी

अकोला : त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद अकोट शहरामध्ये उमटले होते. शहरात दगडफेकीचे प्रकार घडल्यानंतर गेल्या २४ तासांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. आता १७ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

त्रिपुरा येथील घटनेवरून अमरावतीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अकोट शहरात देखील त्याचा परिणाम झाला आहे. शहरातील हनुमाननगर भागात शनिवारी दगडफेकीच्या घटना घडल्या. याप्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी १३ पासून ते १४ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत कलम १४४ अन्वये संचारबंदीचे आदेश लागू केले. अकोट शहराचा संवेदनशील इतिहास लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १७ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावतीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न

अमरावती : शहरात सध्या शांततामय वातावरण असून, यापुढेही शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. शहरात परिस्थिती शांत आहे.  सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा तैनात आहेत. विविध धर्माचे नागरिक सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करत आहेत. सलोख्याचे वातावरण निर्माण होत आहे. यापुढेही असाच सलोखा व शांतता राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले. 

आमदार सुलभा खोडके यांनीही नागरिकांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. झाले ते विसरून आता, सर्वानी सलोख्याचे प्रयत्न करायला हवेत, सामाजिक बंधुभाव जोपासण्यासाठी सर्वाचे योगदान आवश्यक आहे. अनुचित घटनांची झळ सर्वसामान्यांना बसते, त्यामुळे सौहार्द टिकवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सुलभा खोडके म्हणाल्या.

भाजपचे नेते डॉ अनिल बोंडे यांनीही समाजात वितुष्ट निर्माण होऊ नये, यासाठी सर्वानी योगदान देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अमरावतीतील दोन्ही दिवसाच्या घटना दुर्दैवी आहेत, पण काल ज्या भागात शस्त्रे निघाली, त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. शुक्रवारी हिंसा भडकवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे डॉ बोंडे म्हणाले.

अमरावती जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये संचारबंदी

शहरात सलग दोन दिवस घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद जिल्ह्याच्या इतर भागात उमटू नयेत, यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून परतवाडा- अचलपूर या जुळ्या शहरांसह अंजनगाव सुर्जी, तिवसा, वरुड आणि मोर्शी या शहरांमध्ये देखील आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

काल अचलपूर, परतवाडा येथे काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून स्थितीवर नियंत्रण मिळवले. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परतवाडा येथे पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला, या जुळ्या शहरात कालपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली. दुसरीकडे, अंजनगाव सुर्जी, तिवसा, मोर्शी आणि वरुड येथेही, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या शहरांमध्ये शांतता असली, तरी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

अफवावर विश्वास न ठेवता शांतता राखा ;जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

अकोला : समाज माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यात शांतता राखावी व त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज शांतता समितीच्या बैठकीत केले.

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था अबाधित रहावी यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक मिरा पागोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती.

यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर म्हणाले की, जिल्ह्यात अनुचित घटना घडणार नाही, याकरिता प्रशासन सज्ज असून शांततेचा भंग करणे, अफवा पसरवणे आदी प्रकार घडवणाऱ्या असामाजिक तत्त्वावर, गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. शांतता समितीतील सर्व सदस्यांनी जिल्ह्यात शांतता राहील याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, विविध धार्मिक नेते, सामाजिक कार्यकर्ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

– डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Violence in amravati tensions remain high in amravati curfew in amravati zws

ताज्या बातम्या