पाणी टंचाई हे सध्या सातपुडय़ाच्या दऱ्या-खोऱ्यातील ग्रामीण भागातील जनतेसमोरील भीषण संकट आहे. त्यासाठी आता पाणी अडवा, पाणी जिरवाचे कार्य जल व भूमी संधारणाच्या माध्यमातून पुढे नेण्याची आवश्यकता आहे. समर्थ ग्राम उभारणीसाठी जल संवर्धन ही वर्तमानाची गरज आहे, असे प्रतिपादन नंदुरबारचे पालकमंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी केले. राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१२-१३ अंतर्गत महात्मा जोतिबा फुले व जल व भूमी संधारण अभियानांतर्गत अक्राणी येथे आयोजित पाणी जागृती परिषदेत ते बोलत होते. सातपुडय़ाच्या दऱ्या खोऱ्यातील ही पहिलीच पाणी परिषद.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादनमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. माणिकराव गावित, आ. के. सी. पाडवी, जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया आदी उपस्थित होते. सातपुडय़ाच्या दऱ्याखोऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आदिवासी लोकभाषेतून संवाद साधता अ‍ॅड. वळवी यांनी पाण्याचे महत्व लक्षात घेऊन बंधारे बांधणे, पावसाचे पाणी वाया जाऊ न देणे, लहान-मोठे प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे नमूद केले. यातून ग्राम विकास साधला जाईल. गावातील समस्यांना गावातच उत्तरे मिळतील. यामुळे बाहेर जाण्याचीही वेळ गावकऱ्यांवर येणार नाही आणि बाहेरील मदतही घ्यावी लागणार नाही. कोणत्याही गावात दुबार, तिबार शेती, भाजीपाला पिकविता येणे शक्य व्हावे, इतके पाणी उपलब्ध असावे. त्याकरिता शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून भूजलस्तर उंचावणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. समर्थ जलसंवर्धन झाल्यास समर्थ ग्राम संवर्धनही होईल, असेही ते म्हणाले.
सातपुडय़ाच्या दऱ्या खोऱ्यात आता लहान-मोठी धरणे बांधण्यासाठी योग्य अशा जागा फार मर्यादीत आहेत. तसेच भूसंपादन आणि विस्थापितांचे पुनर्वसन यासारख्या प्रश्नांमुळे नवीन धरणे बांधण्यात बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेले धरण-कालवे प्रकल्प व उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करून जो जलसाठा होईल, त्यामधून सर्व गरजा भागविण्याचे नियोजन करावे लागेल, असे डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. खा. माणिकराव गावित, जिल्हाधिकारी बकोरिया, मोतीलाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जलसंधारणाच्या कामात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था, शेतकरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.