रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अनेक भागात आता पाणी टंचाईचेही सावट दाटून आले आहे. जिल्ह्यातील ११९ गाव आणि वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरवात झाली आहे. या गावांना टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यातील ११९ गाववाड्यामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन आता १२ टँकर्सच्या मदतीने या गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या वर्षी साडेचार हजार मिलीमीटर पावासाची जिल्ह्यात नोंद झाली. सरासरी पेक्षा कितीतरी जास्त पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यातील पाणी टंचाई जाणवणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून पेण, रोहा, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील अनेक गावात पाणी समस्या निर्माण होण्यास सुरवात झाली आहे.

पेण तालुक्यात ९ गावे, ६१ वाड्या, रोहा तालुक्यात ४ गाव, २ वाड्या, महाड तालुक्यात १ गाव २ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यात १३ गाव, २७ वाड्या अशा ११९ गाव वाड्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. तर रोहा तालुक्यातील २ हजार ८९६ लोक पाणी समस्येने बाधीत झाले आहेच. त्यामुळे पेण तालुक्यात सात, पोलादपूर तालुक्यात तीन तर महाड तालुक्यात दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पाणी टंचाई असलेल्या गावांना टँकरनी पाणी पुरवठा सुरू केला आहे, गरज असेल तिथे विंधन विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाणी योजनांची काम पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.