आज लहान लेकरांना जाती-पाती माहीत आहेत. एवढंच काय आपण महापुरुषही आपण जाती धर्मांमध्ये वाटून टाकलं. हे योग्य नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.जाती पातींच्या या सगळ्या चक्रांतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. मला कर्मयोगिनी पुरस्कार दिला गेला. माझा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. समाजासाठी आणि धर्मासाठी स्वतःचं आयुष्य त्यांनी पणाला लावलं. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना कर्मयोगिनी म्हटलं गेलं. त्या नावाने असलेला पुरस्कार मला मिळाला. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“मला फेटा घालण्याची इच्छा नाही. फेटा घालण्यासाठी लागणारा स्वाभिमान असतो. समाजात राजकारणाच्या हेतूने जातीच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. एका गावात जेव्हा सगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतील तेव्हाच मी फेटा बांधेन. लहान लेकरं, बालवाडीत जाणारे, शाळेत जाणारे त्यांना जाती माहीत आहेत. आम्हाला १२ वीच्या परीक्षेपर्यंत जात माहीत नव्हती. आता जातीपातींचं मूळ लहान लेकरांपर्यंत पोहचलं आहे हे काही योग्य नाही.”

आपण महापुरुषांनाही जाती-धर्मांमध्ये वाटून टाकलं

“आपण महापुरुषही जातींमध्ये वाटले. सावित्रीबाई यांच्या, महात्मा फुले त्यांचे, छत्रपती त्यांचे असं आपण महापुरुषांनाही वाटून टाकलं आहे. हे काही बरोबर नाही. समाजात होणाऱ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत.”

हे पण वाचा- “मला कोणती जबाबदारी आवडेल, हे सांगायला उशीर झालाय”, पंकजा मुंडेंचं मोठं विधान; तर्क-वितर्कांना उधाण!

स्त्री प्रामाणिक असते. तिने एकदा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट तिच्याकडून पूर्ण केली जाते. माणसं बदलतात. स्त्री मुख्यपदावर असली की ती समर्पित असते. तिचं मन बदलत नाही. एकदा मंगळसूत्र घातलं की सात जन्म ती बदलत नाही. स्त्री प्रामाणिक असते. तिने दिलेल्या शब्दाशी ती प्रामाणिक असते. एकदा शब्द दिला की त्या मोडत नाहीत. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. महासंघवी या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.