पुणे शहरातील एसपी कॉलेजच्या इमारतीसह इतरही अनेक महत्त्वाच्या वास्तू नरहर गणपत पवार या वास्तूविशारदाने बांधल्या आहेत. पण, पुण्याने पवारांना काय दिले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘माणदेशाने महाराष्ट्राला ग.दि. माडगूळकरांचे साहित्यिक दिले. मात्र माफ करा पुण्याने त्यांचा सन्मान केला नाही. म्हणून मी बारामतीला ग. दी माडगूळकर या नावाने मोठं सभागृह बांधलं.’

पुणे शहराविषयीच्या जुन्या आठवणींना शरद पवार यांनी मुलाखती दरम्यान उजाळा दिला. या मुलाखतीत आता पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का?, असा प्रश्न सुधीर गाडगीळ यांनी केला असता. त्यावर आता निवडणूक नाही असे सांगत पवारांनी उत्तर देणे टाळले.

पुण्यात शिक्षण घेताना विविध महाविद्यालयीन निवडणुका पवार पॅनेलच्या माध्यमातून लढवल्या आणि जिंकल्याही. या निवडणुकीमध्ये विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थी असायचे. तेव्हापासून आजपर्यंत संघटन करण्याचे काम केले. आज राजकारणातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण होत असून पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे.

जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे कॉफीटेबल बुक ‘पुणे एकेकाळी ‘आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर सुधीर गाडगीळ यानी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महा विद्यालयीन जीवनापासून आज अखेर पर्यंतच्या पुणे शहरातील अनेक आठवणीना उजाळा देखील दिला. तर यावेळी लेखक मंदार लवाटे, पेपरलीफचे संस्थापक जतन भाटवडेकर उपस्थित होते.