आपली शाळा वाचवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळेच्या विध्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी महापालिकेच्या मुख्यद्वारासमोरच ठिय्या मांडत शाळा भरवली. यावेळी मुले उपाशी असताना भाजपा-शिवसेनेचे नगरसेवक मात्र पालिकेत विधी समितीमध्ये बिर्यानीवर ताव मारत होते.

पिंपरी-चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथे महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेच्या जागेवर पिंपरी-चिंचवडसाठीचे नवे पोलिस मुख्यालय होणार आहे. त्यामुळे या शाळेचे स्थलांतर दळवी नगर येथे झाले आहे. परंतू, याला विद्यार्थी आणि पालकांनी विरोध दर्शविला आहे. आयुक्तालयासंबंधी येथे काम देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, याला येथील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला असून यासाठी महानगरपालिकेवर विद्यार्थी आणि पालकांनी बुधवारी धडक मोर्चा काढला.

मुलांनी सकाळी बाराच्या सुमारास पालिकेवर मोर्चा आणला. यावेळी हे सर्व विद्यार्थी सकाळपासून उपाशी होते. शाळा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. कोण म्हणत देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही, अशा घोषणा यावेळी या विद्यार्थ्यांनी दिल्या. त्यामुळे त्यांना आवरताना सुरक्षा रक्षक, पोलीस अधिकाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली होती. अखेर राष्ट्रगीताद्वारे या आंदोलनाचा शेवट करण्यात आला.

दरम्यान, मुले सकाळपासून उपाशी असल्याने त्यांनी त्याच ठिकाणी डब्ब्यातील जेवण केले. मात्र, त्याचवेळी सत्ताधारी नगरसेवक पालिकेत बिर्यानीवर ताव मारत होते. यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.