नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात तातडीने लोहखनिजांची खाण सुरू करा, असा आग्रह केंद्रातील मोदी सरकारने राज्याकडे धरला असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या मुद्यावर चर्चा करण्यासाठी येत्या २७ ऑगस्टला दिल्लीत बैठक बोलावली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
देशभर सक्रीय असलेल्या नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आजवर कोणतेही विशेष धोरण न आखणाऱ्या केंद्र सरकारने आता या चळवळीच्या प्रभावक्षेत्रात उद्योग उभारणीला प्राधान्य देण्याचे काम हाती घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेजारच्या छत्तीसगडमधील बस्तरचा दौरा करून एका उद्योगाचे भूमिपूजन केले. त्याचीच पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात व्हावी, यासाठी केंद्राने राज्याकडे आग्रह धरला आहे. गडचिरोलीत लोहखनिजांचे साठे भरपूर आहेत. यापैकी काही साठे देशातील नामवंत उद्योगसमूहांना भाडेतत्वावर देण्यातही आले आहेत. मात्र, नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे या उद्योगांना अजून काम सुरू करता आलेले नाही. लोखंड उत्पादनाच्या क्षेत्रात असलेल्या लॉयड समूहाला गडचिरोलीतील सूरजागड परिसरातील साठा खाण विकसित करण्यासाठी मिळाला आहे. या उद्योगाने खाण सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. चार वषार्ंपूर्वी नक्षलवाद्यांनी या समूहाच्या उपाध्यक्षाची हत्या केली होती. आता लॉयडला खाण सुरू करता यावी, यासाठी केंद्रानेच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने व सुरक्षा दलांनी या उद्योगाला संपूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश केंद्राने दिले आहेत.
लॉयडने चंद्रपूर जिल्ह्यातील आष्टी गावाजवळ कारखाना उभारण्याची तयारी दाखवून राज्याकडे शंभर एकर जागेची मागणी केली आहे. ही जागा देण्याचे सरकारने मान्य केले असले तरी सूरजागडमधून लोहखनीज बाहेर काढायचे कसे, हा सर्वासमोरचा प्रश्न आहे. यावर विचार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ ऑगस्टला दिल्लीत बैठक बोलावली आहे. यात मुख्यमंत्र्यांसह राज्याचे पोलीस महासंचालक, नक्षलग्रस्त भागातील अधिकारी, तसेच उद्योग व महसूल खात्याचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. बैठकीच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री उद्या, येथे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. सूरजागड परिसरात नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सुरक्षा दलांच्या तैनातीत खाण सुरू करून लोहखनीज बाहेर काढले तरी खूप हिंसाचार होईल, अशी भीती पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात व्यक्त होत आहे. सूरजागड परिसरातील लोकांना खाण व रोजगार हवा आहे, पण नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे उघडपणे समर्थन करायला कुणी तयार नाही. या हालचाली लक्षात घेऊन नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या संघटना या परिसरात सध्या सक्रीय झाल्या असून त्यांच्याकडून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर आता २७ ऑगस्टच्या बैठकीत नेमके काय ठरते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.