मान्यता मिळूनही कर्मचाऱ्यांची भरती रखडलेली, परंतु उद्घाटनाची लगबग मात्र जोरात असे चित्र सध्या कळमनुरी तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाच्या रुपाने पाहावयास मिळत आहे. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १५) पालकमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या रुग्णालयात आवश्यक पदभरतीच झाली नसल्यामुळे आरोग्य विभाग चांगलाच कात्रीत सापडला आहे. जिल्हा परिषदअंतर्गत वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर विसंबून रुग्णालयाचे कामकाज होणार असल्याची चर्चा आहे.
आखाडा बाळापूर हे कळमनुरी मतदारसंघातील सर्वात मोठे ग्रामपंचायत असलेले गाव आहे. नवीन तालुका निर्मितीच्या यादीत अनेक दिवसांपासून या गावाचे नाव आहे. गावाची लोकसंख्या व परिसरातील दुर्गम गावांचा असलेला संपर्क लक्षात घेता, या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असणे आवश्यक ठरले आहे. आखाडा बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. जागेअभावी रुग्णावर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना पुरेशा प्रमाणात आरोग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांना गरज पडल्यास नांदेड किंवा िहगोली येथे हलवावे लागते. त्यामुळे रुग्णांना मानसिक त्रासासोबत नातेवाईकांना आर्थिक भरुदडही सहन करावा लागतो.
आखाडा बाळापूर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर होऊन अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. सर्व सोयींनी सज्ज असलेल्या या इमारतीत रुग्णांना चांगले उपचार करणे सोयीचे होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवाही मिळणार असल्याने आखाडा बाळापूरसह परिसरातील जनताही या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रतीक्षेत होती. खासदार राजीव सातव यांच्या प्रयत्नातून रुग्णालयाला मान्यता मिळाली, भव्य इमारत उभी राहिली. आरोग्य विभागाने तातडीने रुग्णालयातील पदांना मंजुरी दिली. परंतु प्रत्यक्षात मान्यता मिळूनही पदे भरली गेली नाहीत. शनिवारी (दि. ९) उद्घाटन ठरले होते. मात्र, आता १५ ऑगस्टला पालकमंत्री गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.