इंडो-तिबेटीयन मंगल मैत्री संघातर्फे येथे तीन जानेवारी रोजी जागतिक धर्मनिरपेक्षता नीती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन सकाळी साडे नऊ वाजता बौध्द धर्मगुरु दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे. कर्नाटकमधील भिक्खु ग्येशे ईशी ग्यालस्तेन परिषदेचे मार्गदर्शक आहेत.
या बाबतची माहिती संयोजक टाशी डोलमा यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. जागतिक पातळीवर वाढलेली सत्ता स्पर्धा, आर्थिक तणाव आणि धार्मिक अतिरेक यामुळे सुरू असलेल्या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर, जागतिक शांतता व धार्मिक सलोख्याचा आग्रह धरण्यासाठी ही परिषद भरविण्यात आल्याचे संयोजकांनी नमूद केले. उद्घाटनानंतर दलाई लामा यांचे ‘जागतिक धर्मनिरपेक्षता नीती तत्वांबद्दल भगवान बुध्दांचे विचार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात मान्यवर व निमंत्रितांच्या उपस्थितीत परीषद होईल. या परीषदेला विविध र्धमगुरु, विचारवंत, तत्वज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जागतिक सलोख्यासाठी धर्मनिरपेक्ष तत्वांच्या पर्यायावर मंथन होणार आहे. परिषदेचे कार्याध्यक्षपद बौध्द उपासक भास्करराव बर्वे तर समन्वयकाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर आणि पाली भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा. अतुल भोसेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हॉटेल म्युझ ज्युपिटर येथे ही परिषद होणार आहे. दलाई लामा यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहण्यासाठी नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. मोफत प्रवेशिकांसह इतर माहितीसाठी ९५०३५ ८०५४४, ९९७५९ ३५९२९, ८८८८८ ५०५१५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.