31 March 2020

News Flash

भूतकाळातली वांगी

प्रवचनात वांग्याच्या भाजीची एक छान गोष्ट सांगितली.

एका बुजुर्ग प्रवचनकार ताईंनी त्यांच्या एका प्रवचनात वांग्याच्या भाजीची एक छान गोष्ट सांगितली. त्या कोणाकडे तरी जेवायला गेल्या होत्या तेव्हा वांग्याची भाजी केली होती, ती भाजी काही तितकीशी जमली नव्हती. त्याला काही विशेष चव ढव नव्हती.. आता ती तितकीशी जमली नव्हती हा विषय खरं तर तिथेच सोडून द्यायला हवा होता पण तसं झालं नाही.. काही दिवसांनी त्या आणखी कोणाकडे तरी गेल्या, त्यांनीही वांग्याची भाजीच केली होती.. त्यांची भाजी मात्र चांगली झाली होती, ती भाजी खाताना पुन्हा न जमलेली ती भाजी त्यांना आठवली, काही दिवसांनी मंडईत कृष्णाकाठची ताजी वांगी पाहिल्यावर पुन्हा ती न जमलेली भाजी त्यांना आठवली.. या प्रसंगाचा शेवट करताना त्या म्हणाल्या, ‘‘जी गोष्ट चांगली झाली नाही ती स्मरणात राहिली. त्या पूर्वी चांगल्या चवीची वांग्याची भाजी खाल्ली नव्हती का कधी? खाल्ली होती. पण ती लक्षात राहिली नाही.. बिघडलेली मात्र लक्षात राहिली.. आपलं मन असंच असतं.. जे लक्षात ठेवायला हवं ते ठेवत नाही आणि नको ते धरून बसतं.’’

स्वत:ला नातसून आलेली आज्जे सासूबाई, तिच्या सासूबाई तिला पुरणपोळ्या नीट जमल्या नाहीत म्हणून जेवताना पानावर कसं टाकून बोलल्या हे आजही डोळ्याला पदर लावून सांगत असते, पण याच सासूबाईंनी तिच्या बाळंतपणात तिची सेवा केली हे मात्र विस्मृतीकोशात गेलेलं असतं. मानवी स्वभाव.. नको ते आठवत राहतं.

आमच्या घरी रोज श्लोक पाठ करून आजोबांना म्हणून दाखवण्याची शिस्त होती. कंटाळा यायचा कधी कधी, मग मी नाही पाठ करायचे. आजोबा रागवायचे, कधी कधी अबोला धरायचे. मग मी एका दिवसात आठ श्लोक पाठ करून दाखवायचे. त्याचं कौतुक असायचं, पण त्या दिवशी पाठ केले नाहीत हे ते विसरायचे नाहीत. मग आई नेहमीचं तिचं ठेवणीतलं वाक्य म्हणायची, ‘बूंद से गई वो हौद से नही आती’ तो बूंद एकदा मनातून पडला की तोच लक्षात राहतो. नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी.. काय म्हणायचं या मानवी स्वभावाला?

एखादं झाड कसं जुनी झालेली पिवळी पानं स्वत:हून गाळून टाकतं, ती पानं धरून ठेवत नाही, पण आपण मात्र जुनी त्यातही वाळलेली, आक्रसलेली पानंही धरून ठेवत राहतो. आणि वेळोवेळी ती पानं चघळताना जीभ कडू करून घेतो. खरं तर प्रत्येक क्षणाला सारं नवीन होत असतं. वेळ बदलते, काळ बदलतो, रंग बदलतो, रूप बदलतं, परिस्थिती बदलते. आणि तसाच माणूसही बदलतो. नदीच्या वाहत्या पाण्यासारखा प्रत्येक क्षण नवीन होत असतो..

पाच वर्षांपूर्वी एखादा प्रसंग घडलेला असतो.. त्यातल्या व्यक्तींशी आपलं बोलणं, संभाषण बंद झालेलं असतं. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दिसते तेव्हा तेव्हा आपल्याला तोच प्रसंग आठवत राहतो.. कटू आठवण, अढी अधिकच घट्ट होत जाते.. पाच वर्षांनीही आपण सगळे तेच आणि तसेच आहोत असं मानूनच आपण वागत असतो.. या पाच वर्षांत माणसं बदललेली असू शकतात, हा विचार करण्याएवढे उदार आपण नसतो. त्या व्यक्तीने पुन्हा चांगल्या हेतूने नात्याचा हात पुढे केला तरी आपण धरून ठेवलेली ती कटू आठवण आपल्याला प्रतिसादाचा हात पुढे करू देत नाही. म्हणून कटू आठवण जिथल्या तिथे सोडून देणं हाच उत्तम उपाय. ती कुरवाळत ठेवू नये. आपलं सुदैव की आपण खूप जुनी, भळभळणारी जखम वागवत फिरणारा अश्वत्थामा नाही.. जखम अंगावर, मनावर ताजी ठेवण्याचं दु:ख काय असतं ते त्यालाच माहीत. त्याला तो शाप आहे पण आपल्याला तर अशी सक्ती नाही, मग अश्वत्थाम्याचं दु:ख विनाकारण मागून का घ्यायचं?

मेमरी चिपवरून भूतकाळाच्या आठवणी हळूहळू पुसून टाकून चिपमध्ये नव्या आठवणींना जागा करून द्यायला हवी.. मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर जाणीवपूर्वक पुसून टाकायला हव्यात. त्यातून फक्त धडा घेऊन, कोणाहीबद्दल मनात गाठ न ठेवता पुढे पाऊल टाकायला हवं आणि एखाद्या वळणावर भेटली पुन्हा तीच कटू आठवण तर ‘तुझ्या कटुत्वामध्येही  गोडवाच मी शोधणार आहे..’ असं तिलाच ठणकावून सांगावं. स्मृतिकोशात काय ठेवायचं हे ज्याला समजलं तो खरा विवेकी! भूतकाळाला वर्तमानाची जागा अडवू देऊ  नये..

त्या दोन भिक्षूंची गोष्ट आठवली. संन्यासी दोघे. मार्गक्रमणा करताना वाटेत नदी लागली. काठावर आले. काठावर एक अतिशय सुंदर स्त्री उभी होती. तिने या दोघांना सांगितलं, ‘‘मला पोहता येत नाही, पाण्याची भीती वाटते, आपण मला नदी पार करायला साहाय्य करा.’’ त्यातला एक भिक्षू पुढे झाला. म्हणाला, ‘‘अवश्य. तुम्ही माझ्या खांद्यावर बसा. मी तुम्हाला नदी पार करवतो.’’ ती स्त्री त्याच्या खांद्यावर बसली. तिने त्याला घट्ट धरलं. पाण्याला प्रचंड ओढ होती, त्या भिक्षूने दुसऱ्या भिक्षूचा हात धरला आणि तिघे हळूहळू नदीच्या दुसऱ्या काठावर आले. ती स्त्री खाली उतरली, तिने आभार मानले आणि ती आपल्या वाटेने निघून गेली. भिक्षूही चालत राहिले. रात्री एका झाडाखाली बसल्यावर दुसऱ्या भिक्षूने विचारलं, ‘‘काय रे, आपण संन्यासी, स्त्रीला स्पर्श ही करायचा नाही आपण आणि तू मात्र तिला खांद्यावर घेतलंस?’’ पहिला संन्यासी हसला आणि म्हणाला, ‘‘महाशय, मी तिला कधीच खांद्यावरून उतरवलं, पण ती अजून तुझ्या डोक्यातून उतरली नाही.’’ आपलं बऱ्याचदा या दुसऱ्या भिक्षूसारखं होतं, स्त्री तिच्या गावाला पोहोचली तरी त्याच्या डोक्यात तीच! आठवणीतले सगळे संदर्भ बदलले, संपले तरी आठवण डोक्यात तशीच! त्या नदी पार करण्याच्या, होऊन गेलेल्या प्रसंगातच अडकल्याने त्या भिक्षूने त्या दिवशीची यात्रा उघडय़ा डोळ्यांने, पण बंद मनानेच केली असेल हे सांगायला नको. आपणही ही स्थिती अनेकदा अनुभवतो. इतके भूतकाळात रमतो की ओळखीचा माणूस समोरून हात हलवत गेला तरी आपलं लक्ष जात नाही. डोळे उघडे असतात पण वर्तमानातल्या अ‍ॅन्टेना मात्र बंद असतात. वर्तमानातले असे किती सुंदर क्षण आपल्या बाजूने हात हलवत असेच निघून जात असतील ना. संस्कृतात एक सुंदर सुभाषित आहे. त्यातली, ‘वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणा:’ ही ओळ किती विचार करायला लावणारी! वर्तमानात जगणाऱ्याला विचक्षण म्हटलंय.. विचक्षण, चक्षूशी संबंधित असेल का? वर्तमानाकडे विशेष रीतीने म्हणजे मनाचे डोळेही उघडे ठेवून जो पाहतो तो विचक्षण.. अशी व्याख्या करता येईल का? सावरकर विलायतेला जात होते बोटीने, रात्री डेकवर एकटेच उभे होते. आता लगेच पुन्हा जीवलगांशी भेट होणार नाही हे ते जाणत होते. त्यामुळे त्या रात्रीच्या नीरव एकांतात ते भूतकाळातल्या आठवणीत रमले तर ते योग्यच होतं, पण ते आठवणीत रमले नव्हते तर वर्तमानात टक्क जागे होते.. कशावरून? नजर जाईल तिथे समुद्र, क्षितिज, आकाश.. इतक्या मोठय़ा पटलावरून एक छोटीशी चांदणी निखळून समुद्राकडे झेपावत होती.. काही क्षणांची घटना.. पण विचक्षण सावरकरांनी ती टिपली. नुसती टिपली नाही तर मुखातून काव्याच्या ओळी बाहेर ओसंडल्या.

‘सुनील नभ हे सुंदर नभ हे नभ हे अतल हा..

सुनील सागर सुंदर सागर सागर अतलचि हा..’

वर्तमानात जगणं म्हणजे काय हे अशा थोर व्यक्तींकडूनच शिकावं.

‘कुंग फू पांडा’ या चित्रपटात मास्टर उग्वे नावाचं एक कासव आहे. ते तीनशे वर्षांचं आहे. त्याच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे, ‘यस्टर्डे इज हिस्टरी, टुमारो इज मिस्टरी. टूडे इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड, हेन्स इट इज कॉल्ड द प्रेझेंट.’ गम्मत म्हणजे तीनशे वर्षांचं असलं तरी ते ‘आमच्या वेळेला असं होतं’ असं न म्हणता ‘वर्तमान हीच अमूल्य भेट आहे’ असं सांगतं. रात्री झोपताना आपण टोचणारे अलंकार जसे काढून ठेवतो तशाच टोचणाऱ्या आठवणीही मनातून काढून ठेवाव्यात.. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त अलंकार घालावेत.. सकाळी तन मोकळं, मन मोकळं आणि नवीन वांग्याच्या भाजीची चव चाखायला जीभ ही मोकळी. जशी पुराणातली वानगी.. तशी ही भूतकाळातली वांगी..

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2017 3:52 am

Web Title: kathakathan by dhanashri lele marathi articles
Next Stories
1 बोच
2 हे निद्रे
3 कान सांभाळा..
Just Now!
X