20 October 2019

News Flash

समजून घेऊ या – ‘बदल’!

आपल्या लक्षातही येत नाही आणि एक दिवशी ते आपली उंची ओलांडूनही वर जाऊन आपल्याला सावली देतं आहे

‘बदल’ अखंड सुरू असतात. ते आवश्यक, अनावश्यक, सुखाचे, दु:खाचे, लादलेले, ओढवून घेतलेले, सोडून देण्यासारखे – असे कितीतरी प्रकारचे असतात. त्या प्रत्येक बदलाचा आपल्या सुखदु:खाशी, आनंदाशी संबंध येत असतो. बदलाचं तत्त्व कळलं आणि त्याला पूरक अशा आपल्या समजुतीतही ‘बदल’ करता आला, तर असा कुठलाही बदल सहसा आपलं स्वास्थ्य बिघडवू शकत नाही.

बदल! वाचला तर अगदी सोपा शब्द. बालवाडीच्या पुस्तकात बबन, छगन, मगन – अशा सोप्या शिकण्याच्या शब्दांत घातला तरी खपून जाईल असा. ना कुठली जोडाक्षरं, ना काना-मात्रा, ना उकार. हा शब्द माहीत नाही असा माणूस विरळाच. त्यात काही विचार करण्यासारखं असावं असाही हा शब्द नाही. आपल्या संबंधातलं सरळ, एकमार्गी, सांगितलं ते ऐकणारं असं एखादं माणूस असावं, तसं हा शब्द वाचला की वाटतं. अशा एखाद्या माणसाला किंवा वस्तूला आपण निरुपद्रवी म्हणतो. तो निरुपद्रवी आहे असं म्हटलं तरी आपल्या लक्षात येईल की, तो कसा आहे हे सांगण्यातसुद्धा उपसर्ग, जोडाक्षर असा काही ‘उपद्रव’ आहे. पण मूळ शब्दात मात्र तोसुद्धा नाही!

पण अनेकदा अगदी साध्याशा शब्दात बऱ्याच मोठमोठय़ा गोष्टी सामावलेल्या असतात, महत्त्वाच्याही असतात. इतकंच नव्हे तर, आपल्याच काय इतरांच्या आयुष्यातही सुखदु:ख, स्वास्थ्यापर्यंत पोचणाऱ्या असतात. अगदी शाळेत गणवेशातलाही बदल हाही अनेकदा मुलांसाठी, पालकांसाठी  अडचणीचा ठरू शकतो आणि असे बदल शिक्षण संपेपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी सुरूच असतात. माध्यमात बदल, शिक्षणसंस्थेत बदल, साइडमध्ये बदल, कुणाला साध्या सॅकमध्येसुद्धा बदल हवा असतो. त्यांवरून मतभेद, त्रास, चिडचिड होते. तेव्हा हे बदलाचं प्रकरण इतकं सरळ आणि निरुपद्रवी नाही, हे लक्षात यायला सुरुवात होते. पुढं राहाण्याच्या घरात बदल, मित्रमंडळीत बदल, खाण्यापिण्यात बदल, चाळ-अपार्टमेंट-बंगला इथपासून इंटिरियरमध्ये बदल-असे असंख्य ‘बदल’ आपल्याला सर्वत्र आणि बहुतेक सर्वाच्या बाबतीत घडताना दिसतात.

बदलाचं गणित असं औरच आहे. एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग झालं म्हणून असो किंवा इतर अनेक लोकांनी तसे ‘बदल’ केले म्हणून असो, असे बदल आपल्याकडून नकळत होतात. हे साध्या मिक्सरपासून कापर्यंत कशाच्याही बाबतीत होत असतं. ते अकारण आहेत हे नंतर लक्षात येतं. मग आधीचीच वस्तू अधिक चांगली होती असं वाटतं. कधी जादा ईएमआयचं दु:ख होतं. बदलातसुद्धा सावधता लागते. नाहीतर ती येण्यासाठी किंमत मोजावी लागते!

आपल्या लक्षात येईल की, असं अनेक बाबतीत चालू असतं. ‘बदला’वर विचार केला तर अनेक गोष्टी लक्षात येतील. ‘बदल’ अखंड सुरू असतात. ते आवश्यक, अनावश्यक, सुखाचे, दु:खाचे, लादलेले, ओढवून घेतलेले, सोडून देण्यासारखे – असे कितीतरी प्रकारचे असतात. त्या प्रत्येक बदलाचा आपल्या सुखदु:खाशी, आनंदाशी संबंध येत असतो. बदलाचं तत्त्व कळलं आणि त्याला पूरक अशा आपल्या समजुतीतही ‘बदल’ करता आला, तर असा कुठलाही बदल सहसा आपलं स्वास्थ्य बिघडवू शकत नाही. त्यासाठी अशा अनेक प्रकारच्या बदलांचा थोडा परिचय मात्र वेळीच करून घेणं आवश्यक आहे.

पहिले बदल म्हणजे, नसर्गिक बदल. प्रत्येक दिवसागणिक आपल्या शरीरातल्या अनेक यंत्रणांत ‘बदल’ घडत असतात. बालपणी वाढ, तरुणपणी स्थर्य, प्रौढपणी देहाच्या परतीची वाटचाल आणि वृद्धपणी उरलीसुरली खाती बंद करण्यासाठी म्हणून असे बदल होतच राहातात. माणसात, जीवमात्रांत, वृक्षवल्लीत असे बदल अविरत सुरू असतात. मात्र त्यात एक सुसूत्रता आहे, समानता आहे. उत्पत्ती, विकास, विनाश – असा गरजेचा क्रम आहे. असे नसर्गिक बदल अपरिहार्य असले तरी, हिताचे आहेत. मात्र हे लक्षात येतंच असं नाही.

ते लक्षात नाही आलं तर, आपण मोठे  झालो तरी, आपण लहानच राहावं असं माणसाला वाटतं. निसर्गानं केलेले बदल नाकारण्यात दु:ख आहे, अस्वाथ्य आहे, तर स्वीकारण्यात स्वास्थ्य आहे, निश्चिंतता आहे, आनंद आहे. काळ्या केसांचे रुपेरी झालेले केस हा बदल नैसर्गिक आहे. तो टाळण्याचे प्रयत्न अनसर्गिक असतात.

बदलाचा अस्वीकार असतो. त्यानं मनावर एक सूक्ष्म ताण राहातो. खरंतर हा बदलसुद्धा आपल्यातली रुपेरी परिपक्वता दर्शवतो. आपल्या जगण्यात अनुभवांची, मतांची, निर्णयक्षमतेची, मागितल्यास वेळी सल्ला देण्याची परिपक्वताच निसर्गानं केलेले असे ‘बदल’ सुचवतात. मूळ बदल नाकारण्यापेक्षा अशा तऱ्हेनं सुसंगत बदल आपल्यात घडवले, तर मनुष्य स्वत: आनंदित होतोच, पण इतरांच्या आनंदातही भर घालतो. निसर्गाकडून घडत चाललेल्या अशा बदलांना सामोरा जात या अवस्थेला आलेला वृद्ध माणूस हासुद्धा सर्वाना हवासा वाटतो, या शेवटच्या सोनेरी टप्प्यातही! या बदलांना आपल्या आयुष्यात निसर्गाच्या बाजूनं जे एक स्थान आहे, ते खरंतर निकोप आणि आधी म्हटलं तसं, आनंदाचं आहे. त्याचं पर्यवसान शेवटी सफल जीवनात होतं.

पण याला इतरही अनेक बाजू आहेत. निसर्ग जसा बा किंवा दृश्य स्वरूपाचे बदल घडवतो तसे आतल्या विश्वातही अनेक बदल घडत असतात. मूल लहान असलं तरी त्याला आतलं जग असतं. त्यात त्याच्या आईवडिलांचं, मित्रमंडळींचं, शाळेचं, खेळाचं-सगळ्याचं आपापलं स्थान असतं. वयाबरोबर आणि पुढंपुढं जाणाऱ्या काळाबरोबर आतल्या जगातही खूप बदल घडत असतात. बा बदलापेक्षा हे बदल सूक्ष्म असतात. ते बदल समजून घेणंही आवश्यक असतं. नाहीतर ते कळत नाहीत, त्रासाचे होतात. आपणसुद्धा आतून तसेच बदलक्षम असू तर आपल्याकडं धावत येणारं लहान मूल मोठं झाल्यावर तर असं धावत येत नाहीच, पण आपल्या बरोबर बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट करणारं मूल आता तरुणपणी फिरायला जाताना आईवडिलांची संगत टाळायचा प्रयत्न का करतं, तो बदल त्याच्यात का झाला – हे समजून घेता येतं. नाहीतर उगाचच लहानपणाच्या त्याच्या वागण्याशी तुलना होऊन चिडचिड होते.

मोठय़ांची एकमेकांच्यात नकारात्मक चर्चा होते. एकदा बदलाचं तत्त्व कळलं, तर मग असं करणं अनैसर्गिक आहे, हे लक्षात येऊ शकतं आणि आपणही तसं बदलून त्याला सामोरं जाऊ शकतो. तसं सामोरं जाण्यातसुद्धा बदललेल्या पातळीवरही आपला संवाद टिकतो.

जगताना कितीतरी संबंधांमध्ये असे ‘बदल’ होत असतात. त्यामुळं आपल्याला सुखदु:खही होतं असतं. अर्थात बदलाचं गणित समजलं नसलं तर! मुलांची लग्नं होतात, सुना येतात, मुलंबाळ होतात, नवे नातेवाईक जोडले जातात. प्रत्येक टप्प्यावर भूमिका बदलतात. व्यवसायात चढउतार, नफ्यात बदल, ग्राहकांत बदल – हे होतच असतं. ऑफिसमध्ये कधी बॉस बदलतात, कधी हाताखालची माणसं बदलतात. बदलातसुद्धा आवश्यक, अनावश्यक, कधी कुणाच्या लहरीप्रमाणं – असे अनेक बदल होतात. त्यात आपली पसंती, नापसंती असा कुठला आग्रह न धरता आपल्यातच आवश्यक तो पूरक बदल केला, तर आपल्या आनंदात बिघाड होत नाही. सगळ्या भूमिकांत सर्व जगभर असेच बदल घडत असतात. त्यात काही चुकून किंवा अनिष्ट बदल होत असतील आणि आपल्या हातात असतील, तर एकवेळ आपण ते न स्वीकारले तरी चालतील. साध्या कुठल्याही झाडाच्या रोपटय़ातसुद्धा रोज बदल होत असतो. आपल्या लक्षातही येत नाही आणि एक दिवशी ते आपली उंची ओलांडूनही वर जाऊन आपल्याला सावली देतं आहे, असं लक्षात येईल! आपण जमिनीवर बसून त्या लहानशा रोपटय़ाला पाणी घालताना, त्याच्या छोटय़ा पानावरून हात फिरवीत होतो, त्याच झाडाला आता आपण पाणी घालण्याची गरज तर उरली नाहीच, उलट आपल्यात वयानं झालेला थकव्याकडं झुकणारा बदल आणि त्याच्यात पूर्ण विस्तार होऊन आपल्याला सावली देण्याइतपत आलेलं सामथ्र्य – हे दोन्ही बदल परस्परांना पूरक आणि आनंदाचे आहेत!

त्यासाठी आपण असे शक्य तेवढे ‘बदल’ समजून घेऊ. बदलांकडं थोडं मोकळेपणानं आणि जिज्ञासेनं पाहात राहू. म्हणजे ते कसेही असले तरी आपल्याला आनंददायी ठरतील!

सुहास पेठे – drsspethe@gmail.com

First Published on February 11, 2017 1:10 am

Web Title: understanding words change