News Flash

सुकली बाग

मस्तक हे मनुष्यरूपी झाडावर उमललेलं फूल आहे. ते मनुष्याच्या शरीराचं मूळ नाही.

मस्तक हे मनुष्यरूपी झाडावर उमललेलं फूल आहे. ते मनुष्याच्या शरीराचं मूळ नाही. फुलं सगळ्यात शेवटी येतात अणि ती अंतिम असतात. मुळं सगळ्यात अगोदर असतात आणि मुळांचा विसर पडला तर फुलं कोमेजून जातील. फुलांना स्वत:चं असं जीवन नसतं आणि मुळांचा सांभाळ केला तर फुलं स्वत:च स्वत:ला सांभाळतात. त्यांना सांभाळण्यासाठी वेगळी अशी कुठलीही व्यवस्था करावी लागत नाही; परंतु झाडाकडं पाहिल्यावर असं वाटतं की, फुलं सगळ्यात महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे मनुष्याचं मस्तक सगळ्यात महत्त्वाचं आहे, असं आपल्याला वाटतं. मनुष्याच्या शरीरात मस्तक ही अंतिम गोष्ट आहे. ते मनुष्याच्या शरीराचं मूळ नाही.

माओत्से तुंगनं आपल्या बालपणीची एक आठवण लिहिली आहे. तो लिहितो की, मी लहान होतो तेव्हा माझ्या आईच्या झोपडीजवळ एक सुंदर बाग होती. ती बाग इतकी सुंदर होती आणि बागेत इतकी सुंदर फुलं फुलत की दुरून दुरून लोक ती बघायला येत. पुढं माझी आई म्हातारी झाली आणि आजारी पडली; पण ना तिला आपल्या आजाराची चिंता होती, ना आपल्या म्हातारपणाची. तिला चिंता  एकच की तिच्या बागेचं आता काय होईल. माओ  लहान होता. तो आपल्या आईला म्हणाला की, तू अगदी निश्चिंत राहा. मी तुझ्या बागेची काळजी घेईन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माओ बागेची काळजी घेत असायचा. एका महिन्यानं त्याची आई बरी झाली आणि जशी ती थोडीबहुत चालायला लागली तशी उठून बागेत आली. बाग पाहून ती चांगलीच घाबरली. सारी झाडं सुकून गेली होती. फुलं कोमेजून गळून पडली होती. माओला ती म्हणाली, ‘अरे वेडय़ा, तू तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बागेत असायचास ना? मग काय केलंस तू? या सगळ्या फुलांचा नाश झाला. ही बाग पार सुकून गेली. सगळी झाडं मरायला लागली आहेत. तू काय, करीत काय होतास?’ माओ रडायला लागला. तो स्वत:च त्रासून गेला होता. तो तर रोज दिवसभर मेहनत करीत असे; पण बाग सारखी सुकतच का गेली याचं कारण त्याला कळलंच नाही. तो रडायला लागला आणि म्हणाला की, ‘मी तर खूप काळजी घेतली. मी तर एकेका फुलाचं चुंबन घेत होतो आणि त्यांच्यावर प्रेम करीत होतो. मी प्रत्येक पान पुसत होतो आणि त्याच्यावरची धूळ झाडीत होतो; पण काय झालं काही समजलंच नाही. मी खूप काळजी घेत होतो; पण फुलं कोमेजून गेली, पानं सुकूनच गेली आणि हळूहळू बाग मरगळून गेली.’
त्याची आई हसायला लागली आणि त्याला म्हणाली, ‘तू वेडा आहेस. तुला हे कसं कळलं नाही की, फुलांचा प्राण फुलांत नसतो अन् पानांचाही प्राण पानात नसतो. झाडाचे प्राण जिथं असतात तिथं कुणाचीच दृष्टी पोहोचू शकत नाही. ते ज्या मुळांमध्ये असतात ती मुळं जमिनीच्या खाली दडलेली असतात आणि त्या मुळांची काळजी जर घेण्यात आली नाही तर फुलांचा नि पानांचा सांभाळ करता येणार नाही. त्यांची कितीही चुंबनं घेतली, त्याच्यावर कितीही प्रेम केलं, त्यांच्यावरची धूळ कितीही पुसली तरी झाडं मरगळून जातील; पण फुलांची बिलकूल चिंता न करता मुळांचा सांभाळ केला गेला तरी फुलांचा सांभाळ फुलं स्वत:च करतील.
(साकेत प्रकाशनाच्या ‘ओशो अंतर्यात्रा’ पुस्तकातून साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 1:04 am

Web Title: mind plays important role in human life
Next Stories
1 वेगळे व्हा
2 कौतुकाची भूक
Just Now!
X