समजा तुम्ही चेन्नईच्या स्टेशनवर उतरून टॅक्सी शोधत आहात. भोवती चार-पाच टॅक्सीवाले जमा होऊन तुमच्यासाठी अगम्य तमीळ भाषेत एकच गलका करीत आहेत. तुम्ही पत्त्याची चिठ्ठी पुढे करता. हे ठिकाण जवळ आहे की दूर तुम्हाला माहीत नाही. भाडं वाजवी की अवास्तव हेही समजत नाहीय्! तुम्हाला संशय यायला लागतो. तुम्ही टॅक्सीत बसता. ड्रायव्हर मध्येच मोबाइलवर त्याच्या भाषेत कुणाशी तरी बोलतो. ड्रायव्हर सटासट गल्ल्या बदलतोय. तुमचा संशय पराकोटीला पोचतो. प्रवाशांच्या फसवणुकीची असंख्य उदाहरणे तुमच्या डोळ्यासमोर नाचू लागतात. तुम्ही आता आरडाओरड करणार, तेवढय़ात तो आवाज देतो, ‘युवर हॉटेल सऽऽऽर!’..

सुरेखाची तक्रार ऐकताना मी जणू असा चेन्नईच्या टॅक्सीत बसलो होतो! तिचा संशय ‘विभ्रमाच्या’ कक्षेत येतो की खरा आहे हे ठरवणं मला कठीण होऊन बसलं होतं. सुरेखाचं छोटेसं आयुष्य होतं. सासू-सासरे, सहा वर्षांची मुलगी, प्लंबर नवरा. अठरापगड वस्तीत एक वाडा. समोरच्या गल्लीत एक बाई दोन मुलांसोबत एकटीच राहायची. तिचा नवरा दुबईला कामगार. तो सहा महिन्यातून एकदा यायचा. एकदा सुरेखानं नवऱ्याला स्कूटरवर त्या बाईला बसवून नेताना पाहिलं. संशयाच्या भुंग्यानं त्याक्षणी सुरेखाच्या मनात प्रवेश केला आणि तो भुंगा तिच्या सतत मागे लागला.

Three people were serious injured in the fire at CIDCO Chowpatty
नाशिक : सिडको चौपाटीतील आगीत तीन जण गंभीर
Anand Mahindra hints at reverse colonisation with London's new-age dabbawalas Viral Video
लंडनच्या रस्त्यावर दिसले मुंबईचे डब्बेवाले? Video पाहून आनंद महिंद्रादेखील झाले थक्क, पाहा काय आहे सत्य
how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

गल्लीत त्या स्त्रीविषयी बायकांचं मत चांगलं नव्हतं. सुरेखानं नवऱ्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. लक्षच देतो म्हटलं की माणसाला प्रत्येक गोष्ट खटकायला लागते. ‘‘कशावरनं तुला नवऱ्याच्या चारित्र्याचा संशय येतो?’’ या माझ्या प्रश्नावर तिचा बांध फुटला.‘‘अहो उठता बसता त्यांचं लक्ष तिकडेच. आवाज दिला तर दचकून भानावर येतात. सारखे मोबाइल ओंजळीत घेऊन हलक्या आवाजात बोलतात, बोलत बोलत बाहेर जातात. रात्री उशिरा घरी येतात. दिवसा फोन करावा तर उचलत नाहीत. तुटक बोलतात. रविवारचं चित्रपटाला जाऊ म्हटलं तर टाळतात. यांच्यात बदल झालाय काही तरी.’’

सुरेखाचा नवरा प्लंबर. त्याच्याजवळ तिच्या प्रत्येक आरोपाला फिट बसेल असा पाना होता. तो म्हणाला, ‘‘आमची वस्ती जुनी. घराला लागून घर. कुठेही तोंड फिरवलं तर कुठे तरी लक्ष जाणारच. हिच्या आरोपांमुळे माझंही लक्ष त्या घराकडे जायला लागलंय. ती बाई नवऱ्याच्या माघारी संसार सांभाळते, काम करते. तिला एकदा उशीर झाला, तिने मला विनंती केली. शेजारधर्माला जागावं लागते. म्हणून तिला स्कूटरवर बसवलं तर हिला त्याचं टेन्शन. मी प्लंबर. मला मोबाइलवरच सर्विस कॉल येतात. नाही गेलं तर गिऱ्हाईक हातचं जातं. पूर्वी जायचो आम्ही चित्रपट पाहायला. आताशा हिच्या संशयखोर स्वभावामुळे नको वाटतं.’’

सुरेखाच्या मनात संशयानं घर केलं होतं. नवऱ्याचं एकच म्हणणं होतं, हिच्या मनातला हा संशय काढा. तिला ठीक करा. आता हे खरं, की चारित्र्यावरचा संशय ‘छिन्नमनस्कता’ म्हणजे स्किझोफ्रेनिया या विकाराचं एकमेव लक्षण असू शकतं.

सुरेखा ‘छिन्नमानस’ होती का?

मी तिला माझ्या साहाय्यक तज्ज्ञाकडे पाठवलं. दोघांची तासभर यथेच्छ तपासणी करून तो माझ्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याचं निदान ठाम होतं. सुरेखाला ‘छिन्नमानस’ झालाय. तिचा संशय हे मनोविकाराचं लक्षण आहे.

सुरेखाला नवऱ्याने तिच्या सतत भांडण्याच्या स्वभावामुळे आणलं होतं. तिचं लहान-सहान गोष्टीवरनं संशय घेणं अनाठायी वाटत होतं. कुण्या स्त्रीला एखादेवेळेस स्कूटरवर सोडलं तर लगेच ते ‘प्रतारणा’ या सदरात कसं मोडेल? तिची दिनचर्या बिघडली होती, तिला नवऱ्याच्या प्रत्येक हालचालीचा संशय येऊ  लागला होता.  मी सुरेखाशी पुन्हा बोललो. तिच्या संशयाचे सगळे पैलू तपासून पाहिले. आपला नवरा चांगला आहे, मात्र तो बहकला आहे असं तिला वाटत होतं. तिची बेचैनी, झोप उडणं, भूक न लागणं, आक्रस्ताळेपणा हा दुय्यम म्हणजे या परिस्थितीचा पश्चात परिणाम होता. त्याचा उपचार जरुरी होता, पण तेवढय़ाने तिला छिन्नमानस असल्याचं लेबल लावता येत होतं का?

पती-पत्नी नातेसंबंधातील ‘निष्ठा’ हा एक संवेदनशील कोपरा. निष्ठा नसल्याच्या शंकेचा जेव्हा विभ्रम होतो तेव्हा तो मनोविकाराच्या कक्षेत येतो. त्या वेळी तिच्या किंवा त्याच्यामध्ये मनोविकृतीची इतरही लक्षणे दिसतात. पण जोडीदाराची प्रतारणा ही सर्वसामान्य आयुष्यात घडणारी गोष्ट आहे. त्या वेळी, नुसत्या शंकेनं पछाडलेली, इतर कुठलीही लक्षणे नसलेली स्त्री एक रुग्ण म्हणून समोर आणली जाते तेव्हा मनोविकारतज्ज्ञाचीही कसोटी लागते. सत्याचा आधार नसलेला संशय म्हणजे विभ्रम किंवा ‘डिल्यूजन’ हे मनोविकाराचं लक्षण. पण सत्य म्हणजे काय? ते शोधायचं कोणी? त्या शोधात सत्य हाती लागते का? सुरेखाचा संशय परिस्थिती-सुसंगत होता. तिचा सुरक्षा परीघ तिला सावध करीत होता. भिंतीला पाठ टेकलेला प्राणी जसा फिस्कारून पंजे काढतो, तसा तिने आक्रस्ताळेपणाचा पंजा उगारला होता. तोच विकृतीचा भास निर्माण करीत होता. मला ती अगतिक वाटू लागली.

मनोविकारतज्ज्ञाला लक्षणांची मांडणी विवेकाच्या आधारे करावी लागते.  त्याने लक्षणे ठरवायच्या कसोटय़ा वापराव्या हे अपेक्षित! शंकेचा विचार लवचीक आहे की पक्का, रुग्ण दुसरी बाजू ऐकून घ्यायला तयार आहे का, त्याच्या संशयाने सर्व दैनंदिनी व्यापली आहे का? त्यात विक्षिप्त-विचित्रपणा आहे का? असे सर्व मुद्दे विचारात घेतले जावे हे अपेक्षित! अन्यथा सर्वसाधारण शंका आणि विभ्रम-विकृती या दोन टोकांमधल्या छायाप्रदेशात मनोविकारतज्ज्ञाला नेमका अंदाज येणं कठीण. त्यात प्रतारण-विभ्रम ही तशीही निसरडीच वाट.

सुरेखाच्या मनात संशयाने घर केलं होतं, मात्र ते विकृतीचं अभेद्य घर नव्हतं. त्याला आपुलकीनं, थोडय़ा धीरानं घेतलं तर ते विरघळलं असतं. मी तिच्या नवऱ्याला बोलावलं. त्याची बाजू गंभीरपणे घेतो आहे हे सांगितलं. प्रतारणेचा आरोप खोडून काढण्यासाठी वकिली स्पष्टीकरणाची नाही, आपुलकीची गरज आहे हे समजावलं. त्याने विश्वासघात केला नसेल, पण तिला विश्वासातही घेतलं नव्हतं. विश्वास हा नाजूक नातेसंबंधाचा कणा, तो दुखावला की ‘जरा विसावू या वळणावर’ अशा आधाराच्या जपणुकीशिवाय दुरुस्त होणं कठीण. त्यात संशय ही शंभर पायांची गोम! तिचे दोन-पाच पाय छाटून तिची मेंदूत शिरणारी चाल थांबत नाही. तिला फक्त हलकेच मेंदू बाहेरची वाट दाखवली तरी पुरेसं आहे.

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in