25 April 2018

News Flash

मानवतावाद

वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एखादा माणूस मानवतावादी नसणे शक्य आहे.

शरद बेडेकर | Updated: December 7, 2015 3:12 AM

वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एखादा माणूस मानवतावादी नसणे शक्य आहे. परंतु प्रत्येक मानवतावादी माणसापाशी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ मात्र असलाच पाहिजे. प्रेषित, अवतार, अंतज्र्ञान आणि अर्थातच शाप किंवा वर देऊ शकेल, शिक्षा किंवा कृपा करू शकेल, प्रार्थनेने प्रसन्न होऊन प्रतिसाद देऊ शकेल असा ईश्वर वगैरे गोष्टी मानवतावादात बसत नाहीत..

मानवतावाद ही एक माणूस म्हणून जगण्याची व इतरांना माणसासारखे जगता यावे म्हणून मदत करण्याची साधीसोपी जीवनपद्धत आहे. या पद्धतीत कुठलेही कर्मकांड नाही, कडक आज्ञा नाहीत, गूढ भाषाही नाहीत. वंशभेद, वर्णभेद, लिंगभेदही नाहीत. त्यात मानव ही एकच जात आहे. या सबंध मानवजातीसाठी मानवतावाद हा एकच एक धर्म आहे व त्यामुळे त्याला मानवधर्म असे म्हणता येते. मानवजातीला या धर्मात स्पष्ट अशी ध्येये मात्र आहेत. ती म्हणजे ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय’ ही होत. पण मानवतावाद मानवी कल्याणापलीकडेसुद्धा सावध आहे. म्हणून त्यात ‘प्राणिमात्रावरील दया’ व ‘निसर्गावरील प्रेम’सुद्धा अंतर्भूत आहे; परंतु एका कारणामुळे हे मानवतावादी तत्त्वज्ञान, वाटते तेवढे सोपे नसून कठीण ठरते. ते कारण म्हणजे त्यातील एक ‘गृहीत’ असे आहे की, ‘विश्वातील व त्यातील सर्व घटनांची संगती निसर्गाच्या भौतिक नियमांनुसार लावता आली पाहिजे. निसर्गापलीकडील किंवा भौतिकापलीकडील म्हणजे अद्भुत कारणे मानायला मानवतावाद तयार नाही.
मानवतावाद हे तत्त्वज्ञान जरी अलीकडच्या काळातील असले तरी ‘मानवता’ ही फार प्राचीन असून, मानवतावादाचे पहिले मूलतत्त्व ‘नीतिमत्ता’ हे तर मानवतेहूनही प्राचीन आहे. माणसात नीतिमत्ता स्वाभाविकत:च असते, असे मानवतावाद मानतो. एवढेच नव्हे तर सुसंस्कृत माणसापूर्वीच्या असंस्कृत माणसात आणि तत्पूर्वीच्या उत्क्रांती अवस्थेतील रानटी पूर्वमानवातसुद्धा नीतिमत्ता असली पाहिजे व हळूहळू ती उन्नत होत गेली असली पाहिजे, असे मानवतावाद मानतो. रानटी टोळी अवस्था सोडून सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी जेव्हा मानव स्थिर जीवनाकडे वळून सुसंस्कृत बनू लागला तेव्हाच नीतिमत्ता आणि मानवता निर्माण झाल्या; परंतु नीतिमत्ता व सुसंस्कृतपणा यांच्यापेक्षा मानवतावाद हे तत्त्वज्ञान अधिक व्यापक असून, हा व्यापक विचार पुष्कळ नंतरच्या काळात निर्माण झालेला आहे.
आज मानवतावादी विचार कमी-अधिक प्रमाणात का होईना, पण सर्व जगभर मान्यता पावलेले आहेत. जगभरातील अनेक जुन्या मूल्यांची उलथापालथ होऊन त्या जागी नवी मूल्ये प्रस्थापित झाली आहेत व होत आहेत. विशेषत: फ्रेंच राज्यक्रांतीने (इ. स. १७८१ ते १७९३) जगभरातील मूल्यबदलांना सुरुवात केली असे मानले जाते. त्यानंतर गेल्या दोन-अडीच शतकांतील महत्त्वाच्या अनेक जागतिक घटना ही नवी मूल्ये जगभर प्रसृत व्हायला कारणीभूत झालेल्या आहेत. त्या घटना थोडक्यात अशा : युरोपात सुरू होऊन मग जगभर पसरलेले औद्योगिकीकरण, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध व नंतरचे यादवीयुद्ध, विसाव्या शतकातील दोन जागतिक महायुद्धे, रशियन साम्यवादी क्रांती व नंतर तिचा अस्त, वसाहतवाद नष्ट होऊन जगात नवीन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती, जर्मनीचे एकीकरण, विज्ञान तंत्रज्ञानाचे शोध व त्यांनी जगभर उत्पन्न केलेल्या दळणवळणाच्या, संपर्काच्या सोयी व साधने अशा सर्व कारणांनी जगभर नवविचार पसरले, मोठे वैचारिक अभिसरण झाले, मानवतावादी मूल्ये चर्चिली गेली व त्यांना जगभर एक प्रकारची मान्यता मिळाली. गेल्या काही दशकांमध्ये वैचारिक जगात मानवतावाद हे अगदी ‘चलनी नाणे’ बनलेले आहे व त्यामुळे इतर सर्व तत्त्वज्ञाने व सर्व धर्मसुद्धा ‘आम्ही मानवतावादीच आहोत’ असे म्हणू लागली आहेत. स्वत:ला मानवतावादी म्हणविणारे अनेक तत्त्वज्ञ व अनेक संस्था जगभर निर्माण झाल्या आहेत व त्यामुळे मानवतावादाचा नेमका अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
मानवतावादात नीतीला पहिले स्थान असून, या तत्त्वज्ञानात सर्वात जास्त भर आहे तो माणसाच्या नैतिक प्रगतीवरच. नैतिकता म्हणजे इतरांची कदर करणे, सहानुभूती, मैत्री, दया व प्रेम यांच्या पायावर ती उभी असून, ती मानवाच्या मूळ स्वभावात आहे, असे मानवतावाद मानतो. त्यामुळे या नीतीला ईश्वरासारख्या बाह्य़ शक्तीच्या मंजुरीची काही जरुरी नाही. जगातील सर्व धर्मात जरी नीती हे तत्त्व महत्त्वपूर्ण आहे तरी मूलत: नीती ही जगातील सर्व धर्मापेक्षा जुनी आहे. शिवाय धार्मिक नीती जी ईश्वराच्या हुकमावर आधारित असते, ती पाळल्यामुळे काही बक्षीस व न पाळल्याने काही शिक्षा होणार असते. याउलट मानवतावादी नीती ही माणसात स्वभावत:च असून, त्यात वृद्धी किंवा बदल मानव स्वत:च आपल्या बुद्धीने करतो. म्हणजे मानव हाच मूल्यांचा निर्माता व निर्धारक आहे. शिवाय नम्रता, स्वाभिमान, बौद्धिक सचोटी, ‘स्वत: निश्चित केलेले मत स्वीकारण्याचे धैर्य, इत्यादी सांस्कृतिक गुणसुद्धा, मानवतावाद स्वीकारण्यासाठी आवश्यक आहेत. मानवतावादाचा मूळ दृष्टिकोन अनुभववादी आहे, अंतज्र्ञानवादी नाही, व्यवहारवादी आहे, आदर्शवादी नाही. पुरावा असेल तरच आग्रह धरणे मानवतावादाला मान्य आहे. पुरावा नसेल तर आग्रह अमान्य.’ ‘मानवी समाजाबद्दल प्रेम’ व ‘सामाजिक जबाबदारीची जाणीव’ ही मानवतावादात अत्यंत आवश्यक आहेत. मानवतावाद मानवकेंद्रित आहे, पण व्यक्तिकेंद्रित नाही. समाजवादी व लोकशाही मूल्ये मानवतावादाला मान्य आहेत. प्रत्यक्षात मात्र सर्व धार्मिकांना असे वाटते की, नीतीसारखी उदात्त तत्त्वे जी सर्व धर्मामध्ये आहेत, तीच जर मानवतावादात आहेत, तर मानवतावाद वेगळा कुठे आहे? तो धर्मातच समाविष्ट आहे. म्हणजे ‘सगळेच धर्म मानवतावादी असून, त्यातल्या त्यात माझा धर्म जास्त मानवतावादी आहे’, हे खरे आहे का ते आता इथे पाहू या. १) सर्व धर्मात विश्वाची पालनकर्ती अशी ईश्वरासारखी दिव्य शक्ती व तिचा मानवी जीवनात हस्तक्षेप मानलेला असतो. मानवतावादाला अशा कुणा शक्तीचे अस्तित्व मान्य नाही. २) मानवतावादाला धर्माप्रमाणे दृष्टान्त, साक्षात्कार हेही मान्य नाहीत. ती केवळ मते होत. ३) बहुतेक सर्व धर्मानी ‘निराशावाद’ जोपासलेला आहे. जसे ख्रिस्ती धर्मात माणूस ‘मूळ पापा’चा बोजा घेऊन जन्मतो. हिंदू धर्मात कलियुगात लाखो वर्षे माणसाची सतत अधोगतीच होणार आहे. वगैरे. याउलट मानवतावाद आशावादी आहे. ४) माणसाच्या धार्मिकतेवरून त्याच्या जीवनाचा दर्जा ठरविणे मानवतावादाला मान्य नाही. ५) ऋषिमुनी किंवा असे कुणी चमत्कार करू शकतात, हे धर्माला मान्य, पण मानवतावादाला अमान्य आहे. ६) अपरिवर्तनीय तत्त्व, त्रिकालाबाधित सत्य, अखेरचे सत्य अशा कितीतरी श्रद्धा धर्मामध्ये आहेत, पण मानवतावादाला त्या मान्य नाहीत. (७) तसेच स्वर्ग, नरक, परलोक किंवा आत्मा, पुनर्जन्म इत्यादी धर्ममान्य कल्पना मानवतावादाला अमान्य आहेत.
मानवतावादी माणूस परलोकाकडे दृष्टी ठेवून, जीवन जगण्याच्या मानसिकतेचा त्याग करतो; मृत्यूनंतर आपल्या तथाकथित आत्म्याचे काय होईल अशी काळजी तो करीत नाही; वर्णभेद, जातीयता व अस्पृश्यता या परंपरा, मानवताविरोधी आहेत असेही तो मानतो. मानवतावादी माणसाला जसा धर्माचा मानवतेवरील हक्क मान्य नसतो तसेच तो कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचाही मानवतेवरील हक्क मान्य करीत नाही. याची कारणे अशी की, (१) मार्क्‍सवादात मानवतावादाचे स्वतंत्र निवेदन नाही. (२) माणसाला समाजाच्या बांधकामांनी ‘दगड’ असे स्वरूप मिळाले, तर मानवतावादाला ते मान्य नाही. (३) मानवतावाद हा कामगारवर्गाचा किंवा अमुकतमुक वर्गाचा, पंथाचा, पक्षाचा किंवा विभागाचा मानवतावाद असा असणे शक्य नाही. कारण मग तो मानवतावाद नव्हेच. (४) रशियात झालेल्या प्रत्यक्ष प्रयोगावरून असे दिसते की, कम्युनिझम ही एका पक्षाची किंवा व्यक्तीची हुकूमशाही असून तीत माणसाला महत्त्व नाही. म्हणून साम्यवाद मानवतावादी नसून विरोधी आहे.
मानवतावादात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हे अत्यंत आवश्यक मूल्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एखादा माणूस मानवतावादी नसणे शक्य आहे. परंतु प्रत्येक मानवतावादी माणसापाशी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ मात्र असलाच पाहिजे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक आणि मानवी विचारशक्ती (जी मूलत: निर्मितीक्षम आहे) या गोष्टी मानवी ज्ञानाच्या सीमा वाढविण्यास उपयुक्त आहेत असे मानवतावाद मानतो.
प्रेषित, अवतार, अंतज्र्ञान आणि अर्थातच शाप किंवा वर देऊ शकेल, शिक्षा किंवा कृपा करू शकेल, प्रार्थनेने प्रसन्न होऊन प्रतिसाद देऊ शकेल असा ईश्वर वगैरे गोष्टी मानवतावादात बसत नाहीत, पण मानवी जीवनात अजिबात हस्तक्षेप न करणारा, कुणाला मदत न करणारा, न्याय न देणारा म्हणजे ‘मानवाबद्दल पूर्णत: उदासीन असलेला’ असा एखादा ईश्वर मानणारा कुणी माणूस स्वत:ला ‘आस्तिक’ म्हणवीत असला तरी तसा माणूस मानवतावादी असणे शक्य आहे. अज्ञेयवादी व निरीश्वरवादी माणसे तर मानवतावादी असणे जास्तच शक्य आहे. तसे पाहता ‘मानवतावादी जीवन’ हे ‘ईश्वरविरहित जीवन’ म्हणावे लागेल. कारण सर्वसाधारण माणूस जसा ईश्वराचे अस्तित्व मानतो तसा ईश्वर मानवतावाद मानीत नाही.
मानवजातीचे आजचे आणि उद्याचे जीवन मानवाच्याच हातात आहे, असा मानवतावादी माणसाचा ठाम विश्वास असलाच पाहिजे. म्हणजे मानवतावादी माणूस असे मानतो की, या पृथ्वीवर माणूस जातीला काही धोका निर्माण झालाच तर कुणी ईश्वर किंवा त्याचा अवतार, मानवाला वाचवायला येणार नाही. तसेच एखादा माणूस ‘निरीश्वरवादी असूनसुद्धा मानवतावादी नसणे’ शक्य आहे. परंतु प्रत्येक मानवतावादी माणूस मात्र निरीश्वरवादी असलाच पाहिजे. मागील लेखात ‘निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा’ हे मत जे मांडले होते, ते जास्तीत जास्त लोकांना मानवतावादी बनणे शक्य व्हावे,म्हणूनच होय.

First Published on December 7, 2015 12:46 am

Web Title: scientific vision and human ethics
 1. सुषमा
  Dec 7, 2015 at 11:11 am
  'बाबा वाक्यं प्रमाणं' मानणारे जर विवेकवादाची व मानवतेची कासं धरतील तर त्यांना पृथ्वीवर ह्याची देही ह्याची डोळा स्वर्ग दिसेल. पण लक्षात कोण घेतो? आपल्या लेखमालेने बंद कवाडे किंचितही किलकिली झाली तरी उत्तम.
  Reply
  1. M
   mohammad
   Jan 4, 2016 at 8:57 am
   manavata hi kalachi garaj.............
   Reply
   1. P
    pravin nikam
    Dec 10, 2015 at 4:26 pm
    असे लोक आहेत हे प्रतिक्रिया बघून वाईट वाटले .अश्या प्रतिक्रिया block का नाही करत. अशी भाषा वापरण्यापेक्षा बोलू नये. हे सुसंसृत वाटत नाही. हि आपली जीवन जगण्याची रीत नाही. ईश्वर असेल तर त्यालाही हे नकोशे वाटले असते.
    Reply
    1. O
     om
     Dec 10, 2015 at 2:47 am
     जातपात धर्माने तयार केलेली नाही आपण माणसांनी तयार केली आहे ...इतका हिडीस वाटतो तर इस्लाम स्वीकारा तुमी ...आजपर्यंत बर्याच जननी आमच्या धर्मातून पलायन केल आहे ..आम्हाला काही फरक पडणार नाही ...
     Reply
     1. O
      om
      Dec 7, 2015 at 2:37 am
      स्वामी विवेकानंद ,दयानंद ,रामकृष्ण परमहंस ....असे अनेक महान जागतिक दर्जाचे लोक ईश्वराच अस्तित्व मान्य करतात आणि हा गल्लीतला स्वयंघोषित मानवतावादी,स्वयंघोषित बुद्धिप्रामाण्यावादी ,so called विचारवंत शंका घेतो ... ईश्वर हे प्रत्येकाचे सर्वोच्च ध्येय असायला हवे आणि ईश्वर कणाकणात व्यापक आहे ...
      Reply
      1. O
       om
       Dec 9, 2015 at 2:31 am
       ईश्वर तो जो तुमचा पण आहे माजा पण आहे भारतीयांचा पण आहे शेजार्यांचा पण आहे हिंदूंचा पण आहे इतरांचा पण आहे तो एकाच आहे ज्याने सृष्टीची निर्मिती केली त्याच अस्तित्व सर्व व्यापक आहे सर्व सृष्टी चालवतो तो ईश्वर ... आणि त्याला बघण्यासाठी त्याग करावा लागतो फुकट काहीच भेटत नाही
       Reply
       1. O
        om
        Dec 9, 2015 at 2:26 am
        कसली सुंदर ..एकदम फालतू लेखमाला आहे ..
        Reply
        1. Prasad Ghole.
         Dec 7, 2015 at 5:09 pm
         कुठला ईश्वर ? हे जर स्पष्ट करता का ? कारण सर्व धर्म एकाच ईश्वर सांगत नाहीत . ईश्वर कानन कानात आहे का प्रत्येक काना काणले तुम्ही ईश्वर म्हणत आहात ?
         Reply
         1. P
          Pravin
          Dec 7, 2015 at 10:51 am
          खूप छान लेख .. असेच लिहित रहा... आशा करूया कि कालंतराने चादर ,लाकड आणि दगड चा देव अमान्य होईल , या खोटा देवांसाठी माणसाची कत्तल होणार नाही .
          Reply
          1. शैलजा Shevade
           Dec 8, 2015 at 6:32 am
           काय हे....! हिंदू धर्माचा नीट अभ्यास करा, आणि मग लिहा. ’जिवे जिवे शिवस्वरूपम ; हे हिंदू धर्माचे तत्व आहे... कित्येक हजार वर्षापूर्वी सांगितलेले.. अणि हे महाशय आम्हाला मानवतावाद सांगताहेत..इतर कुठल्याही धर्मापेक्षा केवळ मानवतावादाचाच नव्हे, तर संपूर्ण प्राणिमात्राचा..चराचराचा सुंदर अभ्यास आमच्या धर्माइतका कुणी केला आहे? लेखक सांगताहेत, तसा निराशावाद तर इथे अजिबात नाहीयं.
           Reply
           1. V
            Vaibhav Raikar
            Dec 7, 2015 at 6:27 am
            jar maansane devache asva manya kele nahi tar to m na tharta ek prani tharto karan krutadnyata nighun jaate.aaj jo kaahi vidhwansa jala aahe to Science ne kela aahe dharmaane naahi. aani Nastik ha Nirashavaadi asato. aastik ha devachya guidance ne prayatna karat jaato. kaam karat raahto
            Reply
            1. Load More Comments