‘स्टुडन्ट ऑफ दी इयर’ या पहिल्याच चित्रपटात विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसलेला वरुण धवन, नंतरच्या चित्रपटातून मस्तीखोर तरुणाच्या भूमिकेत समोर आला. ‘बदलापूर’ या आगामी चित्रपटात तो कुटुंबवत्सल पित्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक थरारक सूडनाट्य आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच अशा प्रकारची भूमिका स्वीकारणे वरुणसाठी सोपे नव्हते, खासकरून जेव्हा जवळचे सर्वजण अशा प्रकारची भूमिका न स्वीकारण्याचा सल्ला देत होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, दिग्दर्शक श्रीराम राघवनने जेव्हा वरुणला चित्रपटाची कथा ऐकवली, तेव्हा वरुण हादरून गेला होता. चित्रपटात तो नुकतेच लग्न झालेल्या आणि जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच पित्याची भूमिका साकारत असून, आपल्या अभिनयातून त्याने १८ वर्षांच्या तरुणापासून ४० वर्षांच्या जबाबदार व्यक्तिपर्यंतचा प्रवास दर्शविला आहे. ‘बदलापूर’ चित्रपटातील कामाचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील परिणाम झाल्याचे वरुणने म्हटले आहे. या चित्रपटामुळे त्याचे बरेचसे जवळचे मित्र दुरावले. चित्रपटातील व्यक्तिरेखेत तो एव्हढा समरस झाला की, कालांतराने आपण अभिनय करतोय, असे त्याला वाटेनासे झाले. यामुळे प्रत्यक्ष जीवनात त्याला नैराश्याने ग्रासले आणि जीवन रुक्ष झाल्याची भावना त्याच्यात निर्माण झाली. चित्रपटाच्या पोस्टरवरील वरुणचा नवा अवतार लक्षवेधी दिसत असला, तरी प्रेक्षक बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ‘बदलापूर’ला यश मिळाल्यास मेहनत कामी आल्याचे समाधान वरुणला लाभेल. या सुडनाट्यात हुमा कुरेशी, यामी गौतम आणि नवाझ उद्दीन सिद्दीकी यांच्येदेखील भूमिका आहेत.

badlapur-new-poster-embed