रेश्मा राईकवार

२.०

चिट्टी, डॉ. वशी आणि त्यांच्या करामतींची गोष्ट पुढे नेण्यासाठी जो भव्यदिव्यपणा आणि व्हीएफएक्स तंत्राची अचूक जोड मिळायला हवी ती सुदैवाने २.० मध्ये दिग्दर्शक एस. शंकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने साध्य केली आहे. त्यामुळे आठ वर्षांनी आलेला हा सिक्वल तंत्राच्या बाबतीत भारी पडला आहे. अर्थात इथे चिट्टीला त्याचा पराक्रम दाखवण्यासाठी कारणही तसेच हवे होते. उगाच कुठलातरी खलनायक उभा करण्यापेक्षा सध्या जगाला छळत असलेला मोबाइल, पर्यावरणाचा विषय घेत सकारात्मकता आणि नकारात्मकता यांचे युद्ध दिग्दर्शकाने खेळवले आहे, मात्र पर्यावरणाचा हा विषय रोबोला मोठे करण्याच्या नादात मध्येच सोडून दिल्याने त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. दुसरे म्हणजे २.० पाहताना आयर्नमॅन, हॉकआय अशा माव्‍‌र्हलच्या काही व्यक्तिरेखांची हटकून आठवण झाली तरी सुपरहिरोच्या गोष्टी ज्या पद्धतीने रचल्या जातात ते पाहता पटकथांच्या पातळीवर आपण अजूनही कमी पडतो हे २.० पाहिल्यावर प्रकर्षांने जाणवते.

२०१० मध्ये प्रदर्शित झालेला रोबो हा सर्वार्थाने यंत्र आणि माणूस यांच्यातल्या युद्धाची गोष्ट होती. आठ वर्षांनी चिट्टीला परत आणताना यंत्र आणि माणसाची ही गोष्ट आणखी वेगळ्या पद्धतीने पुढे येते. आधीचा चित्रपट संपता संपता चिट्टी फक्त  संग्रहालयापुरता उरला होता. त्यामुळे इथेही चिट्टीचे दर्शन होण्यासाठी बराच वेळ प्रेक्षकांना वाट पाहावी लागते. चेन्नई शहरातील सगळे मोबाइल अचानक गायब होऊ लागतात. खुद्द डॉ. वशींचाही मोबाइल हातातून आकाशात खेचला जातो. मोबाइल कंपनीशी संबंधित दोन व्यक्तींची हत्याही होते.  मोबाइल पळवणाऱ्या शत्रूचा शोध सुरू होतो. दहशतवादी नाही, परग्रहवासी नाही असा हा अनोळखी शत्रू शोधण्यासाठी आणि त्याला नामोहरम करण्यासाठी डॉ. वशींना पुन्हा चिट्टीला परत बोलावण्याची विनंती सरकारला करावी लागते. मग अगदी अलीकडे आलेल्या अ‍ॅव्हेंजर्सपटात जो सुपरहिरोंची अमानवी शक्ती आणि सरकारचे नियंत्रण असा वाद दिसतो तोच २.० मध्येही येतो. चिट्टी पुन्हा जग वाचवण्यासाठी हजर होतो. चिट्टीला भेटलेला नवा शत्रू पक्षीराजनला (अक्षयकुमार) नियंत्रणात आणताना रंजक घडामोडी होतात.

डॉ. वशींसमोर आव्हान निर्माण करण्यात चित्रपटाचा पूर्वार्ध खर्ची पडला आहे. त्यात डॉ. वशींबरोबर त्यांची एकमेव रोबो सहकारी नीला (अ‍ॅमी जॅक्सन) आहे. बाकी तेच राजकारणी, मोबाइल कंपन्यांचे जाळे उभारणारे उद्योजक, हतबल पोलीस यंत्रणा अशा अनेक रोजच्या पाहिलेल्या घटना आपल्यासमोर येतात. त्यामुळे नाही म्हटले तरी चित्रपटाचा पूर्वार्ध तितकासा पकड घेत नाही. उत्तरार्धात मात्र अनेक घटना एकामागोमाग घडत जातात. प्रत्यक्ष पक्षीराजन आणि चिट्टीचा सामनाही छान जमून आला आहे. इथे सरधोपट मांडणी न करता दिग्दर्शकाने सतत गोष्टीला वळणे देत नवे काही प्रेक्षकांसमोर ठेवले असल्याने चित्रपट कंटाळवाणा होत नाही.

उत्तरार्धात अक्षयकुमार खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसमोर येतो. त्याचे खलनायक म्हणून उभे राहणे आणि खलनायकी लढाई जबरदस्त प्रभावी ठरली आहे. अक्षयचा लूक पाहून हॉकआयची आठवण येते. त्याच्या अभिनयामुळे उत्तरार्धातली लढाई रंगतदार ठरली आहे. अर्थाने सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार असे दोन ताकदीचे कलाकार समोरासमोर पाहायला मिळतात. पण अर्थातच इथे तो खलनायक आहे आणि चिट्टी हिरो आहे त्यामुळे त्यात फार काही वेगळेपणा उरत नाही. उलट इथे दिग्दर्शकाची कथेवरची पकड ढिली झाल्याचे जाणवते. पर्यावरणीय प्रश्नातून उभा राहिलेला खलनायक संपवताना मूळ प्रश्नाला बगल देत दिग्दर्शकाने चित्रपटाचा प्रभाव कमी केला आहे. शेवटी जाता जाता काहीएक मलमपट्टीसारखा उपाय डॉ. वशी सुचवतात. मात्र एवढे नाटय़ उभे करताना त्याची मात्रा योग्य वाटत नाही.

कथेपेक्षा अभिनय आणि त्याहीपेक्षा व्हीएफएक्स तंत्राचा योग्य वापर यामुळे हा चित्रपट छान जमून आला आहे. चिट्टीनंतर पुढे काय हे पाहायचे असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा आणि चित्रपटाच्या शेवटी येणारे गाणे कितीही कंटाळवाणे असले तरी ते संपेपर्यंत थांबणाऱ्यांनाच भविष्याचा दोर सापडू शकतो. (इथेही माव्‍‌र्हलपटांची आठवण येतेच..)

* दिग्दर्शक- एस. शंकर

* कलाकार- रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सन, आदिल हुसैन, सुधांशू पांडे.