अ. भा. मराठी नाटय़संमेलनांच्या आजवरच्या तब्बल ९६ वर्षांच्या वाटचालीत ठाण्यात पहिल्यांदाच नाटय़संमेलन होते आहे, हे यंदाच्या संमेलनाचे एक ठळक वैशिष्टय़. काही गावांतून दोन-दोनदा नाटय़संमेलनं झालेली आहेत; परंतु ठाण्याला मात्र नाटय़संमेलन भरविण्याची संधी एकदाही मिळाली नव्हती. तथापि, यंदा इतर कुणीही संमेलन घेण्यासाठी पुढाकार न घेतल्याने ठाण्याला ही संधी दिली गेली. आणि अवघ्या दीड महिन्यात ठाणेकरांनी हे शिवधनष्य उचलण्याचे ठरविले. आणि कधी नव्हे ते ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी संमेलनाचे यजमानपद स्वीकारले. साधारणत: कॉंग्रेसवाल्यांनाच (दीर्घ काळ सत्तेत असल्याने) साहित्य व नाटय़संमेलनांच्या आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने आणि याकामी शासकीय यंत्रणेसह अन्य यंत्रणा कशा राबवाव्यात याचाही त्यांना दांडगा अनुभव असल्याने संमेलनासाठी लागणारा कोटी-कोटीचा निधी उभारण्यात आणि संमेलन यशस्वी करण्यात त्यांना कधीच अडचण येत नाही. आपल्या व पक्षाच्या प्रतिमा संवर्धनासाठी संमेलनं कशी वापरून घ्यावीत, हे कुणी त्यांच्याकडूनच शिकावं. वर्षांनुवर्षे विरोधी पक्षात असल्याने अन्य पक्षांना हा अनुभव गाठीशी नाही. त्यामुळे या नाटय़संमेलनाबद्दल साहजिकच उत्सुकता होती.

गेले काही दिवस हे संमेलन प्रसार माध्यमांतून वाजते आणि गाजतेही आहे. अर्थात त्याची कारणं सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकच अधिक होती. निधी-उभारणीपासून कार्यक्रमांच्या ढिसाळ आयोजनापर्यंत आणि नाटय़ परिषदेच्या केन्द्रीय पदाधिकाऱ्यांना संमेलनाच्या नियोजनापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यापासून ते आयोजकांतील अंतर्गत कलहापर्यंत अशा अनेक गोष्टींची उलटसुलट चर्चा व वादविवाद यांनी हे संमेलन गाजते आहे. खरं तर या कारणांनी जवळजवळ प्रत्येकच संमेलन (मग ते साहित्य संमेलन असो वा नाटय़संमेलन!) गाजत असते. त्यात नवीन काही नाही. मात्र, या गदारोळात काही सकारात्मक गोष्टींची नोंद घ्यायचं राहून जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच हा प्रपंच.

ठाण्यातील या नाटय़संमेलनाचा पूर्वरंग तब्बल आठवडाभर आधीपासूनच सुरू आहे. १२ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी असे तब्बल दहा दिवस नाटय़संमेलन होण्याचीही बहुधा ही पहिलीच वेळ असावी. त्यातही आठ वेगवेगळ्या ठिकाणी संमेलनातील कार्यक्रम एकाच वेळी सुरू असणे, हेही ठाण्यातील नाटय़संमेलनाचे आगळेवेगळे वैशिष्टय़ आहे. या संपूर्ण संमेलनात सुमारे १२०० कलावंत सहभागी होत आहेत, हाही एक उच्चांकच ठरावा.

आणखीन एक आवर्जून नमुद करावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे- यापूर्वी कधीही घडली नाही अशी घटना या संमेलनानिमित्ताने घडली. ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी आणि वंचित मुलांना नाटक म्हणजे काय, ते कसं सादर होतं, हे अनुभवता यावं म्हणून दुर्गम आदिवासी पाडय़ांतील मुलांना या संमेलनासाठी आवर्जून आणण्यात आलं होतं. त्यांनी आयुष्यात कधीच न पाहिलेलं नाटकाचं जग त्यांनी या संमेलनात पहिल्यांदाच अनुभवलं. त्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या मंडळींचं मन:पूर्वक अभिनंदन करायला हवं.

याखेरीज मुद्दाम उल्लेख करायला हवा तो गडकरी रंगायतनच्या सान्निध्यातील मासुंदा तलावामधील तरत्या रंगमंचावर भल्या सकाळी झालेल्या संगीत मैफलींना ठाणेकर रसिकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल! पहिल्याच दिवशी मॉर्निग वॉककरता आलेल्या माणसांशिवाय कुणीही या कार्यक्रमाकडे फिरकणार नाही असे वाटत असतानाच त्यांच्याखेरीजही अनेक रसिकांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीही हा सुखद धक्का होता.

अशा काही सकारात्मक आणि नावीन्यपूर्ण गोष्टी या संमेलनात घडत असतानाच संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मात्र आजवरच्या इतिहासाचीच पुनरावृत्ती घडताना दिसली. म्हणजे नियोजित वेळेवर संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होऊ  शकला नाही. उद्घाटकच संमेलनस्थळी उशिरा पोहोचले. त्यात हा सोहळा संध्याकाळी संपन्न होत असल्याने प्रसार माध्यमांना त्यांची बातम्यांची डेडलाइन गाठणे मोठय़ा जिकीरीचे गेले. दरवर्षीप्रमाणेच व्यासपीठावर राजकीय नेत्यांचाच वरचष्मा होता. इतका, की शिवसेनेचे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरचे महापौर, आमदार, खासदार, मंत्रिगण यांनीच व्यासपीठ काबीज केले होते. ते स्वाभाविकही होते. कारण त्यांच्याकडूनच संमेलनाला आर्थिक रसद पुरविली गेली होती. त्या बदल्यात त्यांचा आदरसत्कार करणं ओघानं आलंच. तब्बल पस्तिसेक व्यक्तींचे सत्कार या उद्घाटन सोहळ्यात करण्यात आले. त्यातच पाऊणेक तास खर्ची पडला. त्यातल्या त्यात एकच बरी गोष्ट घडली, ती म्हणजे भाषणकर्त्यांनी मात्र संमेलनाला आलेल्यांना फार पिडले नाही. मावळत्या संमेलनाध्यक्ष फैय्याज शेख यांचे मनोगत काहीसे लांबले. त्यांनी काही मुद्दय़ांची अनावश्यक पुनरावृत्ती केली. शेवटी कंटाळून लोकांच्या टाळ्या पडणार की काय, अशी भीती वाटत असतानाच त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. त्यांनी मेलनाध्यक्षांना दोन वर्षांचा कार्यकाल असावा, ही केलेली सूचना मान्य होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण नाटय़ परिषदेच्या केन्द्रीय पदाधिकाऱ्यांना मिरवण्याची आणि राजकारण्यांना आपलं ‘ब्रॅंडिग’ करण्याची ही आयती मिळणारी वार्षिक संधी ते वाया दवडतील असं बिलकूल वाटत नाही. (अगदी संमेलनाचे उद्घाटक उद्धव ठाकरे यांनी परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींना तिथल्या तिथंच व्यासपीठावर ही मागणी मान्य करायची गळ घातली असली आणि त्यांनीही त्यास मान डोलवली असली, तरीही!) फैय्याजबाईंचं म्हणणं अगदीच चुकीचं आहे अशातला भाग नाही. परंतु संमेलनाध्यक्षपद हे शोभेचंच असतं. आणि ते तसंच राहावं याकरता नाटय़ परिषदेच्या घटनेतच तशी तरतूद केली गेली आहे. नाटय़ परिषदेच्या अध्यक्षाचं महत्त्व अबाधित राहावं यासाठी परिषदेतील काही पूर्वसुरींनीच हा बदल हेतुत: केलेला आहे. गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना काहीएक निधी त्यांच्या कार्यकालातील उपक्रमांकरता दिला जातो, तसाच निधी नाटय़संमेलनाध्यक्षालाही मिळावा, ही फैय्याज यांची मागणी कदाचित मान्य होईलही; परंतु त्यासाठी संमेलन आयोजकांनाच त्याची तजवीज करावी लागेल. नाटय़ परिषद आपल्या खिशाला खार लावून असं काही करेल, हे अशक्य आहे. नाटय़संमेलनाध्यक्षांची निवड निवडणुकीने करू नये, ही फैय्याजबाईंची मागणी रास्त आहे. परंतु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांसारखी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक हल्ली होत नाही. नाटय़ परिषदेचे नियामक मंडळ आलेल्या अर्जावर विचारविनिमय करून त्यापैकी एकाची निवड करते. या प्रक्रियेत पारदर्शकता यायला हवी, हे मात्र खरंय. बॅकस्टेज कलावंतांनाही अध्यक्षपदाचा बहुमान मिळायला हवा, हे त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे. कारण नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद हे बहुश: रंगमंचावरचे कलावंत, लेखक, दिग्दर्शक व क्वचित निर्माते यांनाच मिळते. बॅकस्टेजच्या गुणी कलावंतांवर त्यामुळे अन्याय होतो. त्यांना अध्यक्षपद न देण्यामागे अनेक कारणं दिली जातात. त्यातलं प्रमुख कारण म्हणजे या मंडळींना नसलेलं ग्लॅमर. दुसरं म्हणजे ही मंडळी अध्यक्षपदावरून कसले विचार मांडणार, असा पडणारा प्रश्न. परंतु बऱ्याच वेळा रंगमंचावरील कलावंतांकडेही अध्यक्षपदाच्या बहुमानाव्यतिरिक्त सांगण्यासारखं काहीच नसतं. तरीही केवळ त्यांच्या नावाभोवती असलेल्या वलयामुळे त्यांना हा बहुमान मिळतो. मग तसाच बॅकस्टेजच्या कलावंतांना तो का मिळू नये? किमान ते आपल्या कारकीर्दीतले अनुभव तरी या निमित्ताने ‘शेअर’ करतील.

संमेलनाचे उद्घाटक उद्धव ठाकरे यांनी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि  प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी महापालिका आणि शासनाशी संबंधित केलेल्या मागण्या तिथल्या तिथंच मंजूर केल्या. आता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, ते पाहावं लागेल. कारण राजकारण्यांनी संमेलनात दिलेली आश्वासनं नंतर हवेत विरतात असाच आजवरचा अनुभव आहे. नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाहांनी नाटय़ अ‍ॅकॅडमी स्थापन करण्याचा मांडलेला प्रस्तावही नवा नाही. यापूर्वी शरद पवार यांनी या अ‍ॅकॅडमीसाठी जाहीर केलेले पाच कोटी रुपये नाटय़ परिषदेला मिळाले का, आणि ते मिळाले असल्यास त्यांनी त्याचं काय केलं, हेही लोकांना कळलं तर बरं होईल. करंजीकर यांनी परिषदेच्या कामांचा मांडलेला लेखाजोखा प्रभावी होता. मात्र, त्याचबरोबर पारदर्शी कारभाराचीही परिषदेकडून अपेक्षा आहे. ती अद्यापि पूर्ण झालेली नाही. त्यासाठी ते प्रयत्न करतील अशी आशा बाळगूया.

नवे संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर हे तसे गजाली करण्यात पटाईत. त्यामुळेच त्यांनी संमेलनातील रसिकांचा मूड जाणून ‘व्हाया वस्त्रहरण’चा संक्षिप्त प्रयोग अध्यक्षीय भाषण म्हणून सादर केला. त्यांच्या रसाळ गजाली हा रसिकांसाठी आनंदाचा ठेवा असतो. त्याची झलक त्यांनी यानिमित्ताने पेश केली. मात्र, त्यांच्या लिखित भाषणात त्यांनी यापूर्वीच्या अध्यक्षांचीच री ओढली आहे. रंगभूमीशी संबंधित सगळ्या प्रवाहांचा आढावा घेण्याचं नेहमीचं आन्हिक त्यांनी उरकलं आहे, एवढंच. त्यात बोलीभाषांतील नाटकांची स्पर्धा घेण्याचा मुद्दा तेवढा नवीन आहे. तो शासनाने मनावर घेतल्यास त्यांतून उभ्या-आडव्या महाराष्ट्राच्या अनेक बोलींतील नाटकं रसिकांसमोर येऊ शकतील. ज्यातून गावोगावची रंगभूमी समृद्ध व्हायला मदत होईल. त्याच्याच जोडीनं मराठी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहाला आलेली तीच ती मरगळही काहीशी कमी होईल.

ठाण्याच्या नाटय़संमेलनाचा हा पूर्वरंग अशा अनेकानेक गोष्टींनी लक्षात राहील. अर्थात संमेलनाच्या समारोपात काहीतरी वेगळं नाटय़ घडण्याचीही शक्यता आहे. कारण दरवर्षी ओपनिंग बॅट्समन म्हणून येणारे शरद पवार यंदा शेवटचे बॅट्समन म्हणून संमेलनास येत आहेत. शिवाय, राजकीय कारणास्तव संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यापासून दूर राहिलेल्या (की मुद्दाम ठेवल्या गेलेल्या?) भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक मंत्र्यांनाही या इनिंगमध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळणार आहे. ते या संधीचा कसा लाभ उठवतात, ते आता पाहायचं. अर्थात त्यांना जशास तसं उत्तर देण्याकरता शिवसेनेची मंडळीही व्यासपीठावर असणारच आहेत. तेव्हा हा कलगीतुरा रंगतो का, ही उत्सुकता आता ताणली गेली आहे.