करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आलं आहे. तसंच ठिकठिकाणी पोलिस यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे.  इतकंच नाही तर अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका, असं बजावण्यातही येत आहे. मात्र तरीदेखील काही जण घरातून बाहेर पडताना दिसतायेत. त्यामुळे नागरिकांनी घरातून अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडून नये यासाठी अभिनेता हृतिक रोशनने लहान मुलांकडे मदत मागितली आहे.

करोना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. त्यामुळे सरकारसोबतच कलाविश्वातील सेलिब्रिटीदेखील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. त्यामुळेच नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी हृतिक रोशनने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लहान मुलांना आवाहन करत, घरातल्या मोठ्या माणसांना घरातच थांबवायचं असेल तर आता तुम्हीच काहीतरी शकता, असं म्हटलं आहे.

‘हॅलो मुलांनो, आज मला तुमच्या मदतीची गरज आहे. ही जी मोठी माणसं आहेत ना, ती फक्त नावापुरतेच मोठे आहेत. त्यामुळे या मोठ्या माणसांना जागं करायचंय आणि करोनावर मात करायची आहे. या मोठ्या माणसांना समजवावं लागेल की, करोनाशी लढण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाहीये. तर घरात राहून त्याच्याशी सामना करायचा आहे. घरात राहूनच आपली हिंमत दाखवायची आहे. मला माहित आहे, काही मोठी माणसं सांगून सुद्धा ऐकत नाहीत. मात्र  ते तुमचं नक्कीच ऐकतील’, असं हृतिक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ‘जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलालं. त्यांना सांगाल, की जर तुम्हाला कुटुंबाची काळजी असेल तर सोशल डिस्टेन्सिंगचं महत्त्व जाणून घ्या आणि नियमांचं पालन करा.तरच काही तरी शक्य होईल. तसंच तुम्हीदेखील स्वत:ची काळजी घ्या. या मोठ्यांना जागं करायचंय आणि करोनाला हरवायचंय’.

दरम्यान, करोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता हृतिक प्रत्येक वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याप्रमाणेच अन्य सेलिब्रिटीदेखील त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे जनजागृतीचं काम करत आहेत.