सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘रोबो-२’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रोबो-२’ हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ठरण्याची चिन्हे आहेत. चित्रपटाचे बजेट तब्बल २०० ते ३०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ‘रोबो-२’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी हृतिक रोशन, अमिताभ बच्चन यांच्यापासून थेट हॉलीवूडचा अभिनेता अर्नोल्ड श्वार्झनेगरच्या नावाचीही चर्चा होती. अखेर अक्षय कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास देखील सुरूवात झाली असून, चित्रपटातील कलाकारांचा आणि क्रूचा फोटो समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. संगीतकार ए.आर.रेहमान यांनी देखील अक्षय आणि रजनीकांत यांच्यासोबतचा ‘रोबो-२’ च्या सेटवरचा एक फोटो ट्विट केला आहे.
दरम्यान, ‘रोबो’ या मूळ चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती, तर सिक्वलमध्ये एमी जॅक्सन दिसणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान चित्रपटाला संगीत देणार आहेत. हा चित्रपट ३ डी मध्ये पाहता येणार असून, २०१७ पर्यंत चित्रपटगृहात दाखल होण्याची शक्यता आहे.