प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीचे ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. या चित्रपटांच्या यशानंतर रोहितचा आगामी सुर्यवंशी हा चित्रपटही २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या इंग्लिश नावामध्ये ‘U’ च्या ऐवजी दोनवेळा ‘O’ वापरण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या नावाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मात्र या नावातील दोन वेळा वापरण्यात आलेल्या ‘O’ मागे एक रंजक कथा दडलेली आहे.

१९९२ साली सलमान खानची मुख्य भूमिका असलेला ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची निर्मिती विजय गलानी यांनी केली होती. तर दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केलं होतं. या चित्रपटाच्या नावाचे अधिकार मिळावेत यासाठी रोहित शेट्टीने विजय गिलानी यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र विजय गिलानी यांनी हे अधिकार देण्यास स्पष्टपणे नकार दिला. दरम्यान बोनी कपूर यांच्या मध्यस्थीनंतर रोहित शेट्टीला हे अधिकार मिळाले. मात्र अधिकार मिळाल्यानंतर रोहितने चित्रपटाच्या मूळ नावातील स्पेलिंगमध्ये बदल केला. ‘suryavanshi’ च्या ऐवजी त्याने ‘Sooryavanshi’ अशी स्पेलिंग केली.

दरम्यान, ‘सुर्यवंशी’च्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शन सीनचा भरणा असलेला चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सिम्बा’प्रमाणेच हा चित्रपटही पोलिसांवर आधारित असणार आहे.