बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत राफेल फायटर विमानांचं अखेर भारतामध्ये लँडिंग झालं आहे. अंबाला एअर बेसवर ही विमाने बुधवारी दुपारी सुरक्षित उतरली. गेल्या दोन वर्षांपासून या विमानांची चर्चा होती. या फायटर विमानांमुळे भारतीय हवाई दलाचं बळ कैकपटीने वाढल्याचं म्हटलं जात आहे. ही विमानं भारतीय भूमीवर उतरल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांचं स्वागत केलं आहे.

“ओ रामजी माझ्या घरात राफेल आलं” अशा आशयाचं ट्विट करुन अनुपम खेर यांनी राफेल विमानांच कौतुक केलं. याशिवाय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने देखील राफेलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “राफेल भारतीय जमीनीवर उतरलं आहे. वायु सेनेला भरभरुन शुभेच्छा. आता आपण आणखी शक्तीशाली झालो.” अशा आशयाचे ट्विट करुन त्याने आनंद व्यक्त केला आहे. या दोन्ही कलाकारांची ट्विट्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

राफेलची तुकडी हिंदी महासागर क्षेत्रात दाखल होताच, नौदलाने राफेलच्या वैमानिकांना ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या. यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौके बरोबर संपर्क साधला.

पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.