अभिनेता, लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे हे नाव आता घराघरांत लोकप्रिय झाले आहे. मालिका-नाटक-चित्रपट यांचे कथालेखन करता करता प्रवीण तरडे यांनी अभिनयातही तितकाच जम बसवला. अनेक मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर आलेल्या या अभिनेत्याने दिग्दर्शनातही आपले वेगळेपण जपले आहे. तडाखेबंद लेखणी आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’ हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. ‘मुळशी पॅटर्न’ ही नुसती काल्पनिक कथा नाही तर तो एक वास्तव अनुभव आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली एकेकाळी सुबत्ता आणि शांती नांदत असलेल्या गावाची पूर्ण वाताहत कशी झाली याची कथा म्हणजे आपला चित्रपट असल्याचे प्रवीण तरडे यांनी सांगितले.

देशात १९९१ मध्ये आर्थिक विकासाचे वारे वाहू लागले. त्यानंतर ‘आयटी पार्क’, ‘हिल स्टेशन’, ‘एमआयडीसी’ हे सगळं देशभर वाढायला लागलं. मुळशी तालुका हा पुण्यापासून १५ किमीवर आहे. आर्थिक विकास कशा पद्धतीने होईल, कुठले उद्योगधंदे उभे राहतील, त्याचे परिणाम काय होतील याची क ल्पना त्या वेळच्या राजकारण्यांना होती. या आर्थिक विकासाचा परिणाम देशातील अनेक गावं आणि तालुक्यांवर झाला. दिल्लीत जसं गुडगावमध्ये झालं. गुडगावमध्ये एमआयडीसी आलं, आयटी पार्क झालं. तसाच प्रकार हा महाराष्ट्रात खासकरून मुळशीसारख्या शहरांमध्ये घडला, असं तरडे म्हणाले.

aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
A chat with Mahesh Manjrekar and Shreyas Talpade about film actors during Loksatta Adda Entertainment news
‘मराठी लोकांनाच भाषेचा न्यूनगंड’
laxmikant berde daughter swanandi berde debut
लक्ष्मीकांत बेर्डेंची लेकही करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर करणार काम

जी गावं शेतीप्रधान होती तिथे उद्योग येणार म्हणून गावातल्या जमिनींना अवाच्या सवा भाव आले. १९९१ पर्यंत कुठल्याही मोठय़ा शहराच्या १५ किमीच्या परिघात शेती होती, शेतकरी होते. अचानक त्यानंतर झालेल्या आर्थिक सुधारणांनी त्यांच्या जमिनींचे भाव दहा-वीस पटींनी वाढले. पुढच्या पंधरा वर्षांत या जागांवर विकास होणार हे राजकारण्यांना त्या वेळी माहिती होतं. अशा वेळी कुठल्याही प्रकारे लोकांना विश्वासात न घेता त्यांचे लोक गावात उतरले आणि अचानक ५० रुपये चौ. फूट जमिनीचे भाव ५०० रुपये झाले. बिचाऱ्या शेतकऱ्यांना हा नेमका बदल काय हे कधीच कळलं नाही. एरवीही दुष्काळ आणि अनेक आपत्तींनी ग्रासलेल्या शेतकऱ्यासाठी आपल्या जमिनीला एवढा भाव मिळतोय ही भावना सुखावणारी ठरली. मात्र त्यावेळी जमिनी विकताना शेतजमिनी पूर्णपणे विकत घेतल्या गेल्या. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे साधन असलेली जमीन आपण पूर्णपणे काढून घेतो आहोत याचे भान ना राजकारण्यांनी ठेवले ना शेतकऱ्यांना त्यामागचे गुपित कळले. या परिस्थितीतून पुढे जे अराजक निर्माण झाले ते अनेकांनी वास्तवात भोगले आहे, अशी माहिती तरडे यांनी दिली.

चित्रपटाच्या माध्यमातून मुळशीसारख्या गावाची झालेली वाताहत लोकांसमोर आणावी असे आपल्याला वाटले. मी स्वत मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो  आणि त्यानंतर याच गावात जमिनी विकून पेटीभर पैसे घेऊन सधन शेतकरी म्हणून मिरवलेले लोक २००८ नंतर पैसे संपल्यावर आपल्याच जागांवर उभ्या राहिलेल्या ‘आयटीपार्क ’ आणि इतर उद्योगांमध्ये सुरक्षारक्षक किंवा चपराशी म्हणून कसं काम करू लागले. याच शेतकऱ्यांच्या घरात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलं तरुण झाली तेव्हा त्यांच्या घरात दारिद्रय़ाचे दशावतार सुरू झाले होते. या गरिबीला आपणच जबाबदार आहोत हे त्यांच्या वाडवडिलांना लक्षात आलं, मात्र श्रीमंतीत लहानाची मोठी झालेल्या या तरुणांना ते कधी समजलंच नाही. रागाच्या भरात, शिक्षणाच्या अभावी यातील अनेकांनी गुन्हेगारीचा मार्ग धरला. पुढे त्यांचाही वापर झाला आणि अनेक तरुण मुलांची अखेर रक्ताच्या थारोळ्यात झाली, हा सगळा इतिहास आपण प्रत्यक्ष पाहिला आहे, असे तरडे म्हणाले. आर्थिक विकास आणि त्यानंतर झालेले हे बदल केवळ मुळशी जिथे आज हिंजवडी आयटी पार्क उभे आहे त्या एकाच गावात झाले असे नाही. तर हा विनाशकारी बदल देशभरातील अनेक गावांमध्ये घडला. त्याचे अनेक छुपे परिणाम समाजावर झाले मात्र ही माहिती समाजापर्यंत कधीच तितक्या प्रभावीपणे पोहोचली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. आणि एक कलाकार म्हणून लोकांपर्यंत हा विषय या माध्यमातून तितक्याच ताकदीने पोहोचला तर विकासाचा म्हणून हा जो पॅटर्न निर्माण झाला आहे तो आणखी गावांचा बळी घेणार नाही. किमान लोकांना याची जाणीव होईल, या हेतूने ‘मुळशी पॅटर्न’ची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. कलाकाराने नेहमी आपल्या गोष्टी नाटक-चित्रपटांतून मांडल्या पाहिजेत, असा आग्रह धरणाऱ्या प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सूकता आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आधीच पसंती मिळाली आहे आता आपला हा चित्रपट इथला प्रेक्षक कसा स्वीकारतो, याची उत्सुकता असल्याचे तरडे यांनी सांगितले.