बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन या नावाचं फार मोठं प्रस्थ असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलाने अभिषेक बच्चनने कलाविश्वात पदार्पण केलं. काही मोजक्या चित्रपटांमधून अभिनयाची झलक दाखवल्यानंतर अभिषेकने त्याचा मोर्चा वेबविश्वाकडे वळवला आहे. लवकरच तो ‘breathe in to the shadows’ या वेबसीरिजमध्ये झळकणार असून या सीरिजमधील त्याचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय आणि नावाजलेल्या अॅमेझॉन प्राइमच्या आगामी ‘breathe in to the shadows’ या नव्या वेबसीरिजमध्ये अभिषेक झळकणार आहे. अलिकडेच या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरवर असलेल्या गूढ चित्रामुळे नेमकी ही सीरिज कोणत्याविषयावर आधारित असेल हा नवा प्रश्न प्रेक्षकांना भेडसावत आहे. त्यातच अभिषेकचा पहिला लूकही समोर आला असून दिवसेंदिवस या सीरिजविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना दिसते.

“ब्रीद : इन टू द शॅडोज या सीरिजच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण करत असल्यामुळे मला फार आनंद होत आहे आणि त्यासोबतच यात काम करण्याची उत्सुकतादेखील आहे. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून मला सतत प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हे सारं पाहून मी खरंच भारावून गेलो आहे. तसंच त्यांच्यामुळे या नव्या वेबविश्वात पदार्पण करण्यासाठीचा माझा आत्मविश्वास वाढत आहे. या सीरिजच्या माध्यमातून उत्तम कथानक प्रेक्षकांना पाहता येणार आहे”, असं अभिषेक म्हणाला.

२०१८ मध्ये अॅमेझॉन प्राइमवर ‘ब्रीद’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरली होती. या सीरिजमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवन आणि अमित साध यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे या सीरिजचा पुढील सीझन प्रदर्शित व्हावा अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत होती. सुरुवातीला ‘breathe in to the shadows’ चं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर हा ब्रीदचा पुढचा सीझन असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र हा पुढील सीझन नसून नवीन वेबसीरिज आहे.

दरम्यान, सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरिज येत्या १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह अभिनेता अमित साध, सयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे. निथ्या मेननचादेखील हा डिजिटल डेब्यु असल्याचं म्हटलं जात आहे. या सीरिजची निर्मिती अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी केली असून दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं आहे.