रणवीर, रणबीरसारख्या ‘बी टाउन’ मधल्या अभिनेत्यांसोबतच हल्ली काही मराठी अभिनेतेही तरुणाईच्या, मुख्य म्हणजे तरुणींच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातलेच एक नाव म्हणजे आदिनाथ कोठारे. छकुला या चित्रपटाने त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्याला प्रोत्साहन मिळत गेले. अभिनय करता करता आदिनाथने एम.बी.ए. पूर्ण केले. पण, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे ठरविलेल्या आदिनाथने ‘अनवट’, ‘झपाटलेला २’, ‘दुभंग’, ‘माझा छकुला’, ‘वेड लावी जिवा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘हॅलो नंदन’ या चित्रपटांमध्ये काम केले. इतकेच नव्हे तर त्याने ‘गणपत्ती बाप्पा मोरया’ या मालिकेत प्रथमच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सध्या ‘१०० डेज’ या रहस्यमय मालिकेत पोलीस अधिका-याच्या भूमिकेतून तो प्रेक्षकांची मने जिंकत आहे. अनेक मुलींच्या हृदयावर राज्य करणा-या अभिनेत्याच्या मनावर एकेकाळी कुणीतरी दुसरीच व्यक्ती राज्य करत होती. आदिनाथच्या मनावर राज्य करणारी ती व्यक्ती आहे तरी कोण…? हे सांगतोय खुद्द आदिनाथ..

अनेक मुलींच्या मनावर अधिराज्य करणारा आदिनाथ शाळेत असतानाच एका व्यक्तिच्या प्रेमात पडला होता. माझं पहिलं क्रश शाळेत असताना झालं होतं. मला मॉडेल, अभिनेत्री लिसा रे खूप आवडायची. मला एकदा कळलेलं की ती जॉगर्स पार्कला रोज जॉगिंग करायला येते. हे कळताच मी माझ्या मित्रांसोबत सकाळीच उठून जॉगर्स पार्कला गेलो. बराच वेळ उलटूनही ती आम्हाला काही दिसली नाही आणि अशाप्रकारे आमचा पोपट झाला, असे आदिनाथ म्हणाला.

असो, ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यातील अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर हिच्या आदिनाथ प्रेमात पडला. त्याबाबत बोलताना आदिनाथ म्हणालेला की, ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटासाठी नवतारकेचा डॅडी (महेश कोठारे) शोध घेत होते. एका सकाळी मी झोपेतून उठत असताना घरी आलेल्या उर्मिलाला पाहताच तिच्या प्रेमात पडलो. उर्मिला अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच पण पत्नी म्हणूनही ती त्याला जास्त आवडत असल्याचेही तो म्हणतो. आदिनाथला जरी बॉलीवूड अभिनेत्री लिसा रे भेटली नसली तरी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर त्याच्या प्रेमाची जादू नक्कीच चालली.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com