‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातील ‘पत्रास कारण की..’ हा भाग आवर्जून पाहिला जातो. एखादा विषय किंवा व्यक्ती घेऊन हे पत्र लिहिले जाते. त्याचे वाचन पोस्टमनकाकांची भूमिका साकारणारा सागर कारंडे हा अभिनेता करतो. या आठवड्यातील भागात महाराष्ट्रात गाजलेल्या राजकीय नाट्यावर मार्मिक पत्राचं वाचन करण्यात आलं. एका सामान्य कार्यकर्त्याने आमदारांसाठी हे पत्र लिहिलं होतं. याच भागात ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. पोस्टमनकाकांचं पत्र ऐकून संगीतकार अजय-अतुलसह ‘पानिपत’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर नि:शब्द झाले.

काय आहे पत्रात?

प्रिय सर्वपक्षीय आमदारसाहेब,
नमस्कार.. राजकारणामुळे गेला महिनाभर राज्यात जवळपास व्हेंटिलेटरवर असल्यासारखं वाटत होतं. तुम्हाला खरंच सांगतो आमदारसाहेब, पहिल्यांदा तुमच्यामुळे लोनचे हफ्ते विसरलो, लोकलमधील गर्दी विसरलो, रस्त्यावरील खड्डे विसरलो. महिनाभर फक्त कुठला पक्ष काय करणार, कुठला नेता काय डाव टाकणार एवढ्या एकाच विषयावर बोलत होतो आम्ही सारे..वरवर विनोद चालू असले तरी जनता हतबल झाली होती. राजकारण महाराष्ट्राच्या आवडीचा विषय पण यावेळी खूप टेन्शन आलं राजकारणामुळे. अमूक पक्ष जिंकला, अमूक पक्ष हरला पण जनतेला मात्र आपलं पानिपत झाल्यासारखं वाटलं होतं. अर्थात पानिपत पराभव असला तरी तो तेवढाच मोठा विजय आहे. कारण सारखा सारखा लूटमार करायला येणारा अब्दाली पुन्हा तोंड घेऊन परत आला नाही. दिल्लीच्या तख्ताला सुरक्षेसाठी मराठ्यांचाच आधार होता. महाराष्ट्राने देशाला शिवाजी महाराजांच्या रुपाने राजे कसे असावेत, राज्य कसं असावं याचा आदर्श घालून दिलाय. त्या महाराष्ट्रातलं राजकारण देशापुढे नेहमीच आदर्श ठरणारं राहो ही आमची अपेक्षा आहे. पानिपतचा पराभव झाला याचं सगळ्यात मोठं कारण आपल्या लोकांमध्ये एकी नव्हती. पानिपतची सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की देशाला महाराष्ट्राकडून सगळ्यात जास्त अपेक्षा होती. आज देशाने महाराष्ट्राकडून फक्त सगळ्यात जास्त इनकम टॅक्सची अपेक्षा करायची का? देशाला पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची गरज वाटली पाहिजे. जेव्हा विश्वास गमावला जातो, तेव्हा अर्धा पराभव झालेला असतो. आता पुन्हा लढायची प्रेरणा निर्माण होण्यासाठी आधी सगळ्याच पक्षांना पुन्हा नव्याने विश्वास निर्माण करावा लागेल. पुन्हा पानिपत होऊ द्यायचं नसेल तर विश्वास गमावून चालणार नाही.
जय महाराष्ट्र!

आणखी वाचा : मुलांना ओळख मिळावी म्हणून केलं लग्न – अर्चना पुरण सिंग

चालू घडामोडी, राजकारण यावरुन ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात विनोदी अंदाजात कोपरखळी मारण्यात येते. राज्यातील सत्तासंघर्षावरूनही कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेबाजीचाही नाटुकल्यामध्ये वापर करण्यात आला होता.